देशभरात वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता आधीच त्रस्त आहे. अशात आता कांद्याच्या दरातही (Onion Prices) मोठी वाढ झाली आहे. देशातील अनेक शहरांमध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. घाऊक बाजारात कांद्याचे दर 70 ते 80 रुपये किलो झाले आहेत. अनेक शहरांमध्ये कांद्याचे भाव वाढले आहेत. यामध्ये दिल्ली-मुंबईचाही समावेश आहे. काही काळापर्यंत कांदा कमाल 60 रुपयांना विकला जात होता, तो आता 80 ते 100 रुपयांवर पोहोचला आहे. काही शहरांमध्ये, कांद्याचे भाव दुप्पट झाले आहेत.
दिल्ली आणि मुंबईत नोव्हेंबरमध्ये प्रतिकिलो कांद्याचे भाव 5 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. कांद्याच्या वाढत्या दराने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले असतानाच कमी विक्रीमुळे भाव वाढल्याने विक्रेते अडचणीत आले आहेत.
दिल्लीतील एका बाजारातील एका विक्रेत्याने एएनआयशी बोलताना सांगितले की, ‘कांद्याची किंमत 60 रुपयांवरून 70 रुपये किलो झाली आहे. कांद्याचे भाव वाढले आहेत, ते हंगामानुसार ते खाली यायला हवे होते. वाढत्या दराचा परिणाम घरच्या खाण्याच्या सवयींवर झाला आहे. मी सरकारला आवाहन करतो की किमान दररोज वापरल्या जाणाऱ्या भाज्यांच्या किमती कमी करा.’ गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठ्या शहरांमध्ये कांदा महाग झाला असून त्यामुळे ग्राहक नाराज झाले आहेत.
मुंबईतील खरेदीदार डॉ. खान यांनी एएनआयशी किमतीतील वाढीबद्दल बोलताना सांगितले की, ‘कांदा आणि लसूणच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. त्यात दुपटीने वाढ झाली आहे. घरच्या बजेटवरही याचा परिणाम झाला आहे. मी 5 किलो कांदा 360 रुपयांना विकत घेतला.’ वाढत्या भावामुळे कांद्याची विक्री कमी झाली असली तरी स्वयंपाकघरातील महत्त्वाचा भाग असल्याने लोक त्याची खरेदी करत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.