केरळ (Kerala) राज्यातील तिरुवनंतपुर (Thiruvananthapuram) शहरातील श्रीवरहम (Sreevaraham) परिसरात राहणारा एक ऑटो रिक्षा चालक चक्क रातोरात करोडपती बनला आहे. अनूप (Anoop) असे या ऑटो रिक्षा चालकाचे नाव आहे. त्याने यंदाची ओणम बंपर लॉटरी (Onam Bumper Lottery) जिंकली आहे. या लॉटरीची बक्षीस रक्कम यंदाच्या लॉटरीमध्ये सर्वात मोठी म्हणजे 25 कोटी रुपये इतकी आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, अनूप याने एभगवती एजन्सी (Bhagavathy Agency) येथून लॉटरीचे तिकीट शनिवारी (17 सप्टेंबर) रोजी खरेदी केले होते.
ओणम बंपर लॉटरी जिंकल्यानंतर अनूप याला प्रचंड आनंद झाला आहे. सध्या तो ऑटोरिक्षा चालवत असला तरी मुळात तो शेफ आहे. या आधी तो हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत होता आणि शेफ म्हणून काम करण्यासाठी मलेशियाला जाण्याचा विचार करत होता. मलेशियाला जाण्यासाठी त्याने कर्जासाठी बँकेशी संपर्क साधला होता. त्यांचे कर्जही मंजूर झाले आहे.
केरळचे अर्थमंत्री के एन बालगोपाल यांनी रविवारी (19 सप्टेंबर) दुपारी वाहतूक मंत्री अँटोनी राजू आणि वट्टीयुरकावू आमदार व्ही के प्रशांत यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ (Lucky Draw) काढला. केरळ लॉटरीच्या इतिहासातील ओणमची बंपर किंमत ही या वर्षीची सर्वात जास्त किंमतीची रक्कम आहे. या लॉटरीसाठी पहिल्या क्रमांकाच्या नशिबवानासाठी 25 कोटी रुपये आणि 5 कोटी ही द्वितीय पारितोषिकासाठी आणि 10 व्यक्तींसाठी प्रत्येकी 1 कोटी रक्कम तृतीय पारितोषिक म्हणून होती. (हेही वाचा, केरळ मध्ये लॉटरीचं तिकीट विकलं न गेल्याने चिंतेत असलेल्या विक्रेत्यालाच लागलं 12 कोटीचं बक्षीस; असा झाला रातोरात करोडपती!)
प्रथम क्रमांकाच्या पारीतोषिकासाठी तिकीट क्रमांक TJ-750605 ची घोषणा झाली. त्यानंतर भाग्यवान विजेता कोण हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होता. या वेळी अनूपने दावा केला की तो भाग्यवान विजेता आहे. जो स्वीकारण्यात आला. दरम्यान, कर कपातीनंतर अनूपला 15 कोटी 75 लाख रुपये मिळतील.
ओणम बंपर लॉटरीसाठी यंदा 67 लाख ओणम बंपर तिकिटे छापण्यात आली होती. त्यापैकी जवळपास सर्व तिकिटे विकली गेली. तिकीटाचा दर प्रति तिकीट 500 रुपये होता. लॉटरी हा केरळ सरकारच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. दरम्यान, लॉटरी तिकीट विक्री करणाऱ्या थंकरराज यालाही कमीशन मिळणार आहे.