राहुल गांधी यांच्या 19 जून रोजी वाढदिवसानिमित्त (Rahul Gandhi Birthday), अखिल भारतीय युवा काँग्रेस (All India Youth Congress) देशभरातील गरीब आणि गरजूंना 'कोरोना न्याय किट' चे (Corona Nyay Kit) वाटप करणार आहे. यासह गरीब कुटुंबांच्या खात्यावर महिन्याला 7500 रुपये पाठवण्याबरोबरच इतर काही मागण्यांबाबत सोशल मीडियावरही मोहीमही राबविली जाणार आहे. भारतीय युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बिवी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते हे किट जवळजवळ प्रत्येक गरजूंना देण्याचा प्रयत्न करतील. रेशन व्यतिरिक्त, या किटमध्ये मास्क, सॅनिटायझर्स, ग्लोव्हज आणि व्हिटॅमिन सी गोळ्या असतील.
याबाबत बोलताना श्रीनिवास म्हणाले, ‘कोरोना संकटाला सामोरे जाणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. राहुल गांधींचा वाढदिवस हा आमच्यासाठी एक खास प्रसंग आहे आणि या निमित्ताने आम्ही 'कोरोना न्याय किट' गरिबांना देण्याचा प्रयत्न करत आहोत.’ कॉंग्रेस नेते राहुल गांधी 19 जूनला 50 वर्षांचे होतील.
युवा कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव व सोशल मीडिया प्रभारी वैभव वालिया म्हणाले की, 'राहुल गांधी हे देशातील एकमेव नेते आहेत ज्यांनी फेब्रुवारीमध्येच कोरोनाच्या भयंकर संकटाबाबत सरकारला इशारा दिला होता. त्यांनी लॉकडाऊन आणि जनतेच्या मदतीसंदर्भात देखील काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या होत्या, ज्याचा सरकारने अद्याप स्वीकार केला नाही.' वालिया पुढे म्हणाले, 'आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारसमोर काही मागण्या ठेऊ, ज्यामध्ये- पुढील सहा महिन्यांपर्यंत गरीब कुटुंबांच्या खात्यात मासिक 7500 रुपये पाठविण्याची मागणी, मनरेगा अंतर्गत कामाचे दिवस 100 दिवसांवरून 200 दिवसांपर्यंत करण्याची मागणी आणि कोट्यावधी रोजगार वाचविण्यासाठी लघु व मध्यम व्यवसायांना मदत करण्याची मागणी, अशांचा समावेश आहे.
दरम्यान, राहुल गांधींचा वाढदिवस हा 'बियाणे खत वितरण दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय, अखिल भारतीय किसान कॉंग्रेसने (Akhil Bhartiya Kisan Congress) घेतला आहे. किसान कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सुरेंद्र सोलंकी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे आणि किसान कॉंग्रेस सतत त्यांच्याबाबत आवाज उठवत आहे. आता राहुल गांधींच्या वाढदिवशी आम्ही शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे.'