Republic Day 2021: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्राला संबोधत देशवासियांना दिला मोलाचा संदेश, भारतीय सैन्यासह शेतक-यांविषयी व्यक्त केली कृतज्ञता
President Ramnath Kovind (Photo Credits: Twitter)

72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या (72nd Republic Day 2021) पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी देशाला संबोधित करत देशवासियांनी मोलाचा संदेश दिला. जगातली सर्वात मोठी आणि चैतन्यानं सळसळती लोकशाही असलेल्या आपल्या देशाच्या सर्व नागरिकांना बहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हार्दिक शुभेच्छा देत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राष्ट्रपतींनी देशवासियांना संबोधित केले. हा प्रजासत्ताक दिन, देश-परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे असे ते यावेळी म्हणाले.

"लोकशाहीचा आधार मजबूत करणारी ही चारही तत्त्वं, संविधानाच्या सुरुवातीलाच प्रामुख्यानं ठेवण्याचा निर्णय, आमच्या विद्वान घटनाकारांनी मोठ्या विचाराअंतीच घेतला होता. याच आदर्शांनी आमच्या स्वातंत्र्यलढ्याला एक दिशा मिळवून दिली होती. बाळ गंगाधर टिळक, लाला लजपतराय, महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या अनेक महान लोकनेत्यांनी आणि विचारवंतांनी आमच्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली होती. मातृभूमीच्या सोनेरी भविष्यासाठी असलेल्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या होत्या, पण न्याय-स्वातंत्र्य-समता आणि बंधुत्व या मूल्यांनी, या सर्वांच्या स्वप्नांना-कल्पनांना एका धाग्यात गुंफण्याचं काम केलं होतं" असंही राष्ट्रपती आर्वजून म्हणाले.

"इतकी मोठी लोकसंख्या असलेल्या आमच्या देशाला खाद्यान्न आणि दुग्ध उत्पादनांमध्ये स्वावलंबी बनवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बंधू-भगिनींचं, सर्व देशवासीय मनःपूर्वक अभिनंदन करत आहेत. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतही अनेक आव्हानं आणि कोविड सारख्या संकटातही आमच्या शेतकरी बंधू-भगिनींनी कृषी उत्पादनांची कमतरता निर्माण होऊ दिली नाही. त्यामुळेच हा कृतज्ञ देश आमच्या अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे" असे सांगत त्यांनी बळीराजाविषयीही कृतज्ञताही व्यक्त केली.हेदेखील वाचा- Republic Day 2021 Wishes in Marathi: प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन भारतमातेला करा सलाम!

त्याचप्रमाणे "आमच्या सैन्याचे शूर जवान कठीण परिस्थितीतही देशाच्या सीमांचं संरक्षण करत आले आहेत. लडाखमध्ये सियाचीन आणि गलवान खोऱ्यात उणे 50 ते 60 डिग्री सेंटीग्रेड तापमानात सर्व काही गोठवून टाकणाऱ्या थंडीपासून, ते जैसलमेर मधल्या 50 डिग्री सेंटीग्रेडपेक्षाही जास्त असलेल्या तापमानात चटके देणाऱ्या उष्ण हवामानात, जमीन-आकाश आणि दीर्घ लांबीच्या अशा सागरी किनारी क्षेत्रात, आमचे सैनिक भारताच्या संरक्षणाची जबाबदारी, क्षण न क्षण पार पाडत आहेत. आमच्या सैनिकांचं शौर्य, देशप्रेम आणि बलिदान यांचा आम्हा सर्व देशवासीयांना अभिमान वाटतो" असे सांगत त्यांनी आपल्या भारतीय जवानांचे देखील कौतुक केले.

देशाची अन्न सुरक्षा, लष्करी सुरक्षा, नैसर्गिक संकट आणि रोगराईपासून सुरक्षा, तसच विकासाच्या अनेक क्षेत्रांमध्ये, ‌आमच्या वैज्ञानिकांनी आपल्या योगदानानं, राष्ट्रीय प्रयत्नांना बळ मिळवून दिलं आहे. अंतराळा पासून शेती-बागायतीं पर्यंत, शिक्षण संस्थांपासून रुग्णालयां पर्यंत, वैज्ञानिक मंडळींनी आमचं जीवन आणि दैनंदिन कामकाजात सुलभता आणली आहे असेही रामनाथ कोविंद यावेळी म्हणाले.

आपणा सर्वांच्या पूर्वजांची भूमी असलेल्या भारतातून, मी आपल्याला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. आमचे, सशस्त्र दल, निमलष्करी दल आणि पोलीस दलातले जवान, नेहमीच आपलं कुटुंब आणि मित्रपरिवारापासून दूर राहात हा उत्सव साजरा करतात. या सर्व जवानांना मी विशेष शुभेच्छा देतो. मी पुन्हा एकदा आपणा सर्व देशवासीयांचं प्रजासत्ताक दिनानिमित्त अभिनंदन करतो असे सांगत जय हिंद म्हणत आपल्या भाषणाची सांगता केली.