Odisha Train Accident | (Photo Credits: Twitter)

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघाताची (Odisha Train Accident) सीआरएस (CRS) चौकशी पूर्ण झाली आहे. या अपघातामागे कोणताही कट असण्याची शक्यता चौकशीत फेटाळण्यात आली आहे. अहवालामध्ये सिग्नल आणि वाहतूक संचालन विभागात तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांची चूक अपघाताला कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजेच हा अपघात 'मानवी चुकांमुळे' घडला आहे. सध्या सीबीआय देखील या प्रकरणाचा तपास करत आहे, त्यामुळे रेल्वे सीआरएस अहवाल सार्वजनिक करणार नाही. ओडिशा रेल्वे दुर्घटनेत 288 हून अधिक लोक ठार झाले आणि 1000 हून अधिक प्रवासी जखमी झाले.

अपघातानंतर बचाव आणि मदत कार्यादरम्यान उपस्थित असलेल्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या अपघाताच्या सीबीआय चौकशीची शिफारस रेल्वे बोर्डाने केली आहे. त्यानंतर या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. सीबीआयने अद्याप आपला अहवाल रेल्वे बोर्डाला सादर केलेला नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वरिष्ठ रेल्वे अधिकारी म्हणतात, 'बालासोरमधील रेल्वे अपघाताचा सीआरएस अहवाल रेल्वे सार्वजनिक करणार नाही. सीबीआयही या प्रकरणाचा तपास करत आहे. अशा स्थितीत सीबीआयच्या तपासावर सीआरएस अहवालाचा परिणाम होऊ शकतो. दोन्ही अहवालांच्या आधारे एक अंतिम अहवाल तयार केला जाणार आहे.' सिग्नलिंग आणि वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मानवी चुकांमुळे हा अपघात झाल्याचे सीआरएसच्या अहवालात स्पष्ट झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

रेल्वे सुरक्षा आयुक्त यांनी त्यांच्या अहवालात सिग्नलिंग आणि रिले रुमच्या कर्मचाऱ्यांमधील संवादातील कमतरता दर्शविली. माहितीनुसार, अधिकारी ट्रेन ऑपरेशन्ससाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रियेचे पालन करण्यात अयशस्वी ठरले. सीआरएसने बुधवारी (28 जून 2023) रेल्वे बोर्डाला आपला अहवाल सादर केला. सिग्नल देखभाल अधिकाऱ्यांनी नियमानुसार काम केल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यांनी देखभाल करण्यापूर्वी आणि नंतर स्टेशन मास्टरकडे अनुक्रमे डिस्कनेक्शन आणि रिकनेक्शन मेमो सादर केले होते. याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिग्नलिंग सिस्टम पूर्णपणे योग्य होती. मात्र रेल्वे रुळावरून जाण्यास परवानगी देण्यापूर्वी सिग्नलिंग सिस्टिम तपासण्यासाठी सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले नाही.

एवढेच नाही तर देखभाल अधिकाऱ्याने रिकनेक्शन मेमो दिल्यानंतरही सिग्नलिंग कर्मचारी काम करत होते. अशा स्थितीत स्थानकाच्या सिग्नलिंग विभागाबरोबरच वाहतूक संचालन विभागही अपघाताला जबाबदार आहे. रिले रुममध्ये जाण्यासाठी केलेल्या प्रोटोकॉलमध्येही त्रुटी आढळल्या. कोरोमंडल एक्स्प्रेसला मुख्य मार्गावरून जाण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आल्याचेही या अहवालात उघड झाले आहे. पण ट्रेनची दिशा दाखवणारी ट्रॅकिंग सिस्टीम ट्रेनला लूप लाइनमध्ये जाण्याचे सिग्नल देत होती, त्यामुळे हा अपघात झाला. (हेही वाचा: Manipur Violence: मणिपूरचा हिंसाचार पूर्ववनियोजित, मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी व्यक्त केली शंका)

दरम्यान, 2 जून 2023 रोजी संध्याकाळी सुमारे 6:55 मिनिटांनी कोरोमंडल एक्सप्रेस ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील महानगा गावाजवळ रुळावरून घसरली. यानंतर ही गाडी लूप लाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. मालगाडीला धडकल्यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही डबे लगतच्या रुळावर गेले. त्याचवेळी यशवंतपूर-हावडा सुपरफास्ट ट्रेन या ट्रॅकवर दुसऱ्या दिशेने आली आणि कोरोमंडल एक्स्प्रेसच्या डब्यांना धडकली. अशाप्रकारे तीन गाड्यांचा हा भीषण अपघात झाला.