भारताने तंत्रज्ञान, विज्ञान अशा अनेक गोष्टींमध्ये कितीही प्रगती केली तरी, इथल्या अंधश्रद्धा (Superstitions) नेहमीच देशाच्या प्रगतीच्या आड येणार आहेत. आताही देश कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीशी लढत असताना एकीकडे लस, औषधे यांवर चर्चा आणि संशोधन चालू आहे, मात्र दुसरीकडे या विषाणूची साथ घालवण्यासाठी नरबळी (Human Sacrifice) दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओडिशाच्या (Odisha) कटक (Cuttack) जिल्ह्यातील नरसिंहपूर येथील एका मंदिराच्या पुजार्याने (Priest), कोरोना विषाणूचे संकट टळावे म्हणून, एका व्यक्तीला ठार मारून देवीला नरबळी दिला आहे. नरसिंहपूर बंधहुडा गावात बुधवारी रात्री एका व्यक्तीचा मृतदेह ब्राह्मणी देवी मंदिर परिसरात सापडला. स्थानिक पोलिसांनी या हत्येमध्ये वापरली गेलेली शस्त्रे जप्त केली आहेत.
पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे व पुजाऱ्याने आपला गुन्हाही कबूल केला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन या घटनेचा तपास सुरू केला आहे. संसारी ओझा (Sansari Ojha) असे आरोपीचे नाव असून त्याचे वय 70 वर्षे आहे. एसपी कटक राधा विनोद यांनी यासंदर्भात माहिती दिली. जुन्या भांडणामधून ही घटना घडली असावी असाही अंदाज लावला जात आहे.
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी त्याला देवी मंगलाने स्वप्नात सांगितले होते की, नरबळी दिल्यावर इथला परिसर कोरोना महामारीपासून मुक्त होईल. यानंतर बुधवारी रात्री, जेव्हा गावातील 55 वर्षीय सरोज प्रधान नावाची व्यक्ती मंदिरात पोहोचली, तेव्हा पुजाऱ्याने योजनेनुसार धारधार शस्त्राने त्याचे डोके धडापासून वेगळे केले. देवीला हे बलिदान दिल्यानंतर आरोपी पुजारी संसारी ओझा याने नरसिंहपूर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले, त्यावेळी पुजारीचे हात, पाय आणि संपूर्ण शरीर रक्ताच्या डागांनी माखलेले होते. (हेही वाचा: अशी असू शकते 1 जूनपासून सुरु होणाऱ्या संभाव्य लॉक डाऊनची गाईडलाईन; जाणून घ्या काय म्हणतात रिपोर्ट्स)
मात्र स्थानिक लोकांचे म्हणणे आहे पुजारी संसारी ओझा आणि स्थानिक रहिवासी सरोज प्रधान यांच्यात विविध घटनांवरून अनेक वाद होते. सरोज पुजार्याला नेहमीला त्रास द्यायचा. यामुळे या घटनेकडे एक खून म्हणूनही पहिले जात आहे.