Lockdown 5.0: अशी असू शकते 1 जूनपासून सुरु होणाऱ्या संभाव्य लॉक डाऊनची गाईडलाईन; जाणून घ्या काय म्हणतात रिपोर्ट्स
Lockdown in India (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या लॉक डाऊनचा चौथा (Lockdown 4) टप्पा रविवारी (31 मे) रोजी संपत आहे. दरम्यान, त्यानंतरही लॉक डाऊन वाढले जाण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. सद्यस्थिती लक्षात घेता काही ठिकाणी लॉकडाऊन वाढविण्यात येईल, परंतु त्यात आणखी काही सवलतीही देण्यात येतील, असा दावा अनेक माध्यमांनी केला आहे. सरकार सध्याच्या लॉक डाऊनच्या समाप्तीनंतर लॉकडाउन 5.0 साठी नवीन गाईडलाईन जारी करू शकते, असेही या माध्यमांनी म्हटले आहे. आज आम्ही अशाच काही संभाव्य लॉक डाऊन 5 मधील माध्यमांनी वर्वलेल्या शिथिलता तुम्हाला सांगणार आहोत.

देशात अजूनही कोविड-19 ची प्रकरणे वाढत आहेत, या पार्श्वभूमीवर असा विश्वास आहे की केंद्र सरकार कदाचित आणखी दोन आठवडे लॉकडाऊन वाढवेल. मात्र असे झाले तरी, लॉकडाउन 5.0 चे नियम पूर्वीसारखे कडक असणार नाहीत. अनेक राज्य सरकारांनीही याचे संकेत दिले आहेत.

न्यूज-18 च्या वृत्तानुसार, लॉकडाउन 5 मध्ये मॉल, सिनेमा हॉल, शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांवर बंदी कायम राहण्याची शक्यता आहे. अहवालात म्हटले आहे की, कंटेन्मेंट झोन  (Containment Zones) वगळता इतर ठिकाणी जिम उघडण्यास परवानगी दिली जाऊ शकते, जे आतापर्यंत सर्व ठिकाणी बंद आहे.

इंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार केंद्राने यापूर्वीच लॉकडाऊन वाढवण्यासाठी रोडमॅप तयार करण्यास सुरवात केली आहे. या अहवालात म्हटले आहे की, लॉक डाऊनच्या पाचव्या टप्प्यात राज्यांना कोविड-19 बाबत राज्यातील परिस्थितीनुसार निर्णय शिथीलतेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातील. यावेळी शॉपिंग मॉल्स देखील उघडता येऊ शकतात. याआधी 1 जूनपासून कर्नाटक आणि लखनऊमधील सर्व मॉल्स खुले होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे व घरगुती उड्डाणे सुरू झाल्यानंतर आता दिल्ली मेट्रोलाही 1 जूनपासून हिरवा झेंडा दाखवला जाऊ शकतो. (हेही वाचा: Coronavirus: रेड झोन मधून आलेल्या घोड्याला केले क्वारंटाईन; देशातील पहिलीच घटना)

डेक्कन हेराल्डच्या अहवालानुसार 1 जूनपासून कोरोन विषाणूच्या सर्वाधिक घटना असलेल्या शहरांमध्ये, लॉक डाउन 5 सुरू होईल. म्हणजेच केवळ प्रभावित भागांमध्ये लॉकडाउन वाढण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात देशातील बर्‍याच भागांना निर्बंधातून सूट मिळू शकते, असे या अहवालात म्हटले आहे. मेट्रो, बसेस यासारख्या परिवहन सेवा सुरू होण्याची अपेक्षाही या अहवालामध्ये व्यक्त केली आहे. याशिवाय धार्मिक स्थळेही उघडता येतील, असेही सांगितले आहे. कर्नाटक सरकारने 1 जूनपासून मंदिर, मशिदी आणि चर्च सुरू करण्याचे आधीच जाहीर केले आहे.

दरम्यान, बर्‍याच मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी 'मन की बात' कार्यक्रमामध्ये लॉकडाऊन 5.0 बद्दलघोषणा करू शकतात. त्यांचा हा कार्यक्रम 31 मे रोजी अखिल भारतीय रेडिओवर प्रसारित होणार आहे. मात्र 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान नक्की काय बोलतील याची पुष्टी झालेली नाही. याबाबत गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, बातमीतील सर्व दावे हे पत्रकाराचे स्वतःचे अनुमान आहे. त्यामुळे गृहमंत्रालयाच्या आधारे ही बातमी देणे हे अत्यंत चुकीचे आणि बेजबाबदारपणाचे आहे.