
ओडीसाच्या (Odisha) बोलंगीर (Balangir) जिल्ह्यात एका 19 वर्षीय मुलीला आजारातून बरे करण्यासाठी, तिच्या डोक्यात अनेक सुया टोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका तांत्रिकाला (Tantrik) अटक करण्यात आली आहे. पीडितेवर आता भीमा भोई वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तांत्रिकाने केलेल्या तथाकथित उपचारादरम्यान ही महिला शुद्धीत नव्हती. अहवालानुसार, बोलंगीर जिल्ह्यातील सिंदकेला पोलीस हद्दीतील इंच गावात राहणारी रेश्मा बेहरा ही आजारपणाच्या उपचारासाठी, जिल्ह्यातील जमुतझुला गावातील तांत्रिक संतोष राणा याच्याकडे गेली होती.
रेश्मा चार वर्षांपासून एका गूढ आजाराने त्रस्त आहे. पारंपारिक वैद्यकीय उपचारांद्वारे उपाय शोधण्यात अयशस्वी झाल्यानंतर, तिच्या कुटुंबाने रोग बरा होण्याच्या आशेने आध्यात्मिक उपचार करणाऱ्याची मदत घेण्याचे ठरवले. त्यानंतर हे कुटुंबीय रेश्माला घेऊन संतोषकडे गेले. संतोष राणा या तांत्रिकाने रेश्माला उपचाराच्या बहाण्याने दुसऱ्या खोलीत नेले. कथितरित्या, त्याने एक विचित्र प्रक्रिया केली व तिला बेशुद्ध करून तिच्या डोक्यात खुपसल्या. (हेही वाचा: POCSO Offence: 'आपले धोतर उचलून अल्पवयीन व्यक्तीला लिंग मोजण्यास सांगणे, हा पॉक्सोअंतर्गत गंभीर गुन्हा'; Kerala High Court ची टिपण्णी)
ही बाब रेश्माच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यातील आठ सुया काढल्या आणि त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी भीमा भोई वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. सीटी स्कॅनमध्ये तिच्या डोक्यात 10 हून अधिक सुया अडकल्याचे समोर आले. त्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ तांत्रिकावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.