पुरी मधील जगन्नाथ मंदिर भाविकांसाठी खुले पण दर्शनासाठी 'या' कागदपत्रांची अट
Jagannath Temple | File image | (Photo Credits: PTI)

ओडिशा मधील पुरी स्थित जगन्नाथ मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मात्र मंदिराच्या प्रवेशासंदर्भात श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने असे म्हटले आहे की, भाविकांना कोरोनाच्या नियमांचे पालन आणि सोशल डिस्टंन्सिंगचा नियम पाळावा लागणार आहे. त्याचसोबत भाविकांकडे जर कोरोनाचे निगेटिव्ह आरटी-पीसीआर किंवा लसीकरणाचे सर्टिफिकेट असेल तरच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. मंदिर प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या विधानात असे म्हटले आहे की, 23 ऑगस्ट पासून सर्व भाविकांना दर्शनासाठी परवानगी असणार आहे.

कोरोनाच्या परिस्थितीमुळे मंदिर गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ बंद केले होते. ANI याच्या मते मंदिर प्रशासनाने असे म्हटले आहे की, पुरी नगर पालिका क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना 20 ऑगस्ट पर्यंतच दर्शनासाठी परवानगी असणार आहे. मंदिरात दर्शनासाठी येण्याकरिता वेळ ठरवण्यात आली आहे. दर्शन सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घेता येणार आहे. एका अधिकाऱ्याने म्हटले की, सामान्य नागरिकांना येत्या 23 ऑगस्ट पासून मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे.(लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी 90 टक्के पालकांचा विरोध- सर्वेक्षण) 

यापूर्वी 11 ऑगस्टला मंदिर प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सुचनेत असे म्हटले की, मंदिर पुन्हा सुरु करण्याबद्दल मुख्य प्रशासक डॉ. कृष्ण कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. बैठकीत मंदिर सुरु करण्याबद्दल सविस्तर चर्चा झाली होती. या चर्चेच्या वेळी कोरोनासह काही महत्वाचे मुद्दे सुद्धा उपस्थितीत करण्यात आले होते. तर मंदिर हे सर्व विकेंड आणि प्रमुख सणांच्या वेळी मात्र बंद ठेवले जाणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.

मंदिर प्रशासनाने असा सुद्धा निर्णय घेतला आहे की, सर्व सणांच्या वेळी गर्दी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिर मुख्य सणांच्या वेळी बंद असणार आहे. तसेच राज्याबाहेरील नागरिक जर दर्शनाला येत असतील तर त्यांच्याकडे 96 तासांच्या आतमध्ये आरटी-पीसीआर चाचणी किंवा कोविड लसीकरणाचे सर्टिफिकेट असणे बंधनकारक असणार आहे.