Dr Harsh Vardhan (Photo Credits: ANI)

गेल्या 8 महिन्यापासून भारत कोरोना व्हायरसशी (Coronavirus) लढत आहे. अशात देशात अनेक आरोग्य कर्मचारी फ्रंटलाईनवर या विषाणूशी झुंज देत आहेत. आता अशा अग्रभागी लढणार्‍या कोविड योद्धांसाठी (COVID Warriors) आरोग्यमंत्री हर्षवर्धन (Health Minister Dr Harsh Vardhan) यांनी मोठी घोषणा केली आहे. हर्षवर्धन यांनी सांगितले आहे की, बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी अर्थात एमबीबीएसमध्ये (MBBS) कोरोना वॉरियर्सच्या मुलांसाठी पाच जागा राखीव ठेवल्या जातील. सरकारी वृत्तसेवा प्रसार भारतीनुसार, कोविड वॉरियर्सच्या कक्षेत कोण येईल हे देखील आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी जाहीर केले आहे की, मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस जागांपैकी 5 जागा कोविड वॉरियरच्या मुलांसाठी राखीव ठेवल्या जातील. केंद्रीय मंत्री म्हणाले की, कोविड वॉरियर्स हे जमिनीवर काम करणारे आशा कामगार किंवा रुग्णालयात काम करणारे परिचारिका किंवा डॉक्टर होय. राष्ट्रीय कोट्यात त्यांच्या मुलांसाठी 5 जागा राखीव ठेवल्या आहेत. या मुलांना मेरिटच्या आधारे उमेदवारी दिली जाईल. आरोग्य मंत्रालयाने सेंट्रल पूल एमबीबीएस/बीडीएस जागांखाली, 2020-21 मध्ये 'कोविड वॉरियर्स'च्या उमेदवारांच्या निवडीसाठी आणि उमेदवारीसाठी नवीन श्रेणीस मान्यता दिली आहे. (हेही वाचा: मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन सत्र परीक्षांचे स्वरुप जाहीर; कोणत्या शाखेसाठी कशी असेल प्रश्नपत्रिका? जाणून घ्या)

या श्रेणीचे नाव 'वार्ड्स ऑफ कोविड वॉरियर्स' असे आहे. कोरोना रूग्णांच्या उपचारादरम्यान ज्यांचे पालक मरण पावले आहेत अशा विद्यार्थ्यांना या कोट्याअंतर्गत सीट दिली जाईल. 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी पाच सेंट्रल पूल एमबीबीएस जागा या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी ही घोषणा फिक्की लेडीज ऑर्गनायझेशनच्या एका कार्यक्रमात केली. आरोग्यमंत्री म्हणाले की, रुग्णांचे उपचार आणि व्यवस्थापनात कोरोना वॉरियर्सने दिलेल्या महान योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले की नि: स्वार्थपणे देशाची सेवा करणाऱ्या सर्व कोविड योद्धांसाठी आम्ही वचनबद्ध आहोत.