महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. पण त्याच्या एक दिवस आधी आज (20 फेब्रुवारी) राज्यात शिक्षकेतर कर्मचार्यांनी बंद पुकारला आहे. राज्यातील महाविद्यालयीन आणि विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप (Non Teaching Staff Strike) सुरू झाला आहे. आश्वासित प्रगती योजना, 58 महिन्याची थकबाकी, 1410 कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा या मागण्यांसाठी या कर्मचार्यांनी आता संपाचं अस्त्र उपसलं आहे.
विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी अनकेदा प्रशासनाकडे निवेदनं दिली आहेत. बैठका झाल्या आहेत. पण सकारात्मकतेने विचार करण्याच्या या निर्णयाबाबत प्रत्यक्षात मात्र ठोस पावलं उचलली गेली नाही. मागील 3 वर्षांपासून सतत पाठपुरावा करून देखील त्याची कुणीच दखल घेत नाही. त्यामुळे आता या कर्मचार्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षकेतर कर्मचार्यांच्या पदाधिकार्यांसोबत बैठक घेतली आहे पण त्यांच्या मागण्यांना लेखी स्वरूपात जो पर्यंत मान्यता मिळत नाही तो पर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पण शिक्षकेतर कर्मचार्यांच्या या भूमिकेमुळे उद्यापासून सुरू होणार्या 12वी च्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. 12वी सोबतच पदवीच्या विद्यार्थ्यांना देखील बसण्याची शक्यता आहे.
यंदा कोविड 19 संकटानंतर पहिल्यांदाच कोणत्याही कोविड निर्बंधांशिवाय परीक्षा होणार आहे. राज्यात बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण १४,५७,२९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी झालेली आहे. या परीक्षेला ७,९२,७८० विद्यार्थी, ६,६४,४४१ विद्यार्थीनी आहेत. एकूण १०,३८८ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ३१९५ मुख्य केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.