इंडियन बँकेने (Indian Bank) आपल्या एटीएम मधून 2000 रुपयांच्या नोटा पुरवणे बंद करून त्याऐवजी कमी मूल्याच्या नोटा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर काही दिवसांपासून बाजारातून पूर्णतः 2000 च्या नोटा बंद केल्या जाणार अशा चर्चा होत्या. मात्र यावर आता स्वतः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी स्पष्टीकरण देत, केंद्र सरकार तर्फे बँकांना असे कोणतेही आदेश देण्यात आले नाही असे सांगितले आहे. दोन हजार रुपयांच्या नोटांचे सुट्टे करणे खूपच अवघड जाते. केवळ एवढ्याच कामासाठी लोक बँकेत गर्दी करतात त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या कमी करण्यात येणार असल्याचे म्हंटले जात होते. माध्यमांच्या माहितीनुसार, 2000 रुपयांच्या नोटांची एटीएम मधील जागा आता कमी होण्यास सुरुवात झाली असून ज्या ट्रे मध्ये या नोटा ठेवल्या जातात त्याजागी 100 आणि 200 रुपयांच्या नोटा भरण्यात येत आहेत अशाही चर्चा होत्या मात्र या सर्व मुद्द्यांना सीतारामन यांनी पूर्णविराम दिला आहे.
वास्तविक गेल्या वर्षी एका RTI च्या प्रश्नावर उत्तर देताना रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन 2000 रुपये मूल्याच्या नोटांचे व्यवहारातील प्रमाण कमी होत असल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. त्यानंतर इंडियन बँकेच्या घोषणेनंतर पुन्हा एकदा 2000 च्या नोटा बंद होणार असल्याच्या चर्चा होत्या.(हेही वाचा: Fact Check: 2000 हजारांच्या नोटा बंद होणार? 1 हजाराच्या नव्या नोटा चलनात येणार? जाणून घ्या काय आहे सत्य)
दरम्यान, सार्वजनिक बँक क्षेत्रातील इंडियन बँक ने आपल्या 40,000 एटीएममध्ये 2000 रुपयांच्या नोटा टाकणे बंद करण्यात आल्याचे स्पष्ट केले आले आहे. हा संस्थेचा निर्णय असून या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 1 मार्चपासून करण्यात आली आहे. इंडियन बँकेच्या एटीएममध्ये 2000 रुपयांऐवजी आता 100 , 200 आणि 500 रुपयांच्या नोटा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.