FM Nirmala Sitharaman (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे अनेक स्थरांतरीत मजूरांचे हाल होताना दिसत आहेत. लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या या मोठ्या प्रश्नावर काँग्रेस नेते राहूल गांधी सुरुवातीपासूनच संवेदनशीलरीत्या आपले मत मांडत आहेत. काल 16 मे रोजी त्यांनी दिल्ली फ्लायओव्हर जवळील मजूरांची भेट घेतली. राहुल गांधींच्या या भेटीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (17 मे) पत्रकार परिषदेत निशाणा साधला. 'ड्रामेबाजी' असा उल्लेख करत त्यांनी राहुल गांधी यांच्या मजूर भेटीवर टीका केली. तसंच कोविड 19 लॉकडाऊन काळात निर्माण झालेल्या स्थलांतरीत मजूरांच्या प्रश्नाबाबत केंद्रावर टीका करण्यापूर्वी काँग्रेसने अधिक जबाबदार व्हावे असेही अर्थमंत्री म्हणाल्या.

आत्मनिर्भर भारत अभियान आर्थिक पॅकेज अंतर्गत अर्थमंत्र्यांनी आज 5 वी आणि अखेरची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले. "स्थलांतरीत मजूरांसोबत बसून वेळ घालवण्यापेक्षा त्यांचे सामान घेऊन त्यांच्यासोबत चाला," असेही त्या म्हणाल्या. "काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांना स्थलांतरीत मजूरांसाठी अधिक ट्रेन्सची सोय करण्यास सांगा त्यामुळे ते वेळेत घरी पोहचली. तुम्ही आम्हाला ड्रामेबाज म्हणता. मग काल झालं ते काय होतं? ड्रामेबाजी?" असा संतप्त सवालही त्यांनी केला. (महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे, त्यामुळे केंद्राने राज्याला पूर्ण पाठिंबा द्यावा - राहुल गांधी)

पहा व्हिडिओ:

त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मजूरांचे प्रश्न सरकारसह चर्चा करुन सोडवण्याची विनंतीही अर्थमंत्र्यांनी केली. त्यावेळेस बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या, "स्थलांतरीत मजूरांचा प्रश्न सोडवण्यासाठी विरोधी पक्षाने सरकारला साथ द्यावी. आम्ही सर्व राज्यांमधील मजूरांच्या प्रश्नांवर लक्ष देत आहोत. त्यामुळे सोनिया गांधी यांना माझी हात जोडून विनंती आहे की, आपण याबाबत बोलू आणि अधिक जबाबदारीने ही परिस्थिती हाताळू."

शनिवारी (16 मे) राहुल गांधी यांनी दिल्लीहून स्वगृही निघालेल्या मजूरांची भेट घेतली. दिल्लीतील सुखदेव विहार उड्डाणपूलाजवळ मजूरांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसने मजूरांना डांबून ठेवल्याचे आरोप दिल्ली पोलिसांवर केले होते. परंतु, दिल्ली पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले.