गुजरात: दलित मुलीची सामूहिक बलात्कार केल्यानंतर हत्या, मृतदेह झाडाला लटकवला; निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती
Image used for representational purpose | (Photo Credits: IANS)

निर्भया सामूहिक बलात्कार (Nirbhaya Gang Rape) प्रकरणासारखीच आणखी एक घटना गुजरात (Gujarat) राज्यातील एका गावात घडल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. या घटनेत नराधमांची विक्रृती पीडितेवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्यावरही थांबली नाही. बलात्कार केल्यावर त्यांनी तिची हत्या केली आणि मृतदेह झाडाला लटकवला. 'द हिंदू' वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना उत्तर गुजरात प्रदेशातील आहे. पीडिता 19 वर्षांची दलित महिला (Dalit Woman) असल्याचे समजते. आरोपींनी पहिल्यांदा पीडितेचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिची हत्या करुन मृतदेह झाडाला लटकवून तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. या घटनेत चौघेजण आरोपी असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

प्राप्त माहितीनुसार, डॉक्टरांच्या एका पथकाने अहमदाबाद येथील सरकारी इस्पितळात पीडितेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदन अहवालात पीडितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. दरम्यान, ही घटना पुढे येताच सोशल मीडियाव नेटीझन्स पीडितेला न्याय देण्याची मागणी करु लागले आहेत. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता 31 डिसेंबर 2019 या दिवसापासून बेपत्ता होती. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच रविवार दिनांक 5 जानेवारी 2020 या दिवशी पीडितेचा मृतदेह सापडला.

दरम्यान, 3 जानेवारी 2020 या दिवशी पीडितेचे कुटुंबीय स्थानिक पोलिसांमध्ये मुलगी हरवल्याची तक्रार देण्यासाठी गेले होते. मात्र, तक्रार नोंदवून घेण्याऐवजी 'तुमची मुलगी ही स्वत:च्या मर्जीने मुलासोबत पळून गेली असावी. त्यांनी आतापर्यंत लग्नही केले असेल आणि सर्व काही सुरळीत असेल', असा उपदेश पोलीसांनी केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबाने केला आहे. दरम्यान, 5 जानेवारी 2020 या दिवशी पीडितेचा मृतदेह झाडाला लटकवलेल्या अवस्थेत आढळून आला. (हेही वाचा, लज्जास्पद! चिमुरडींच्या गुप्तांगात पेन्सिल टाकून लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षिकेला अटक)

Twitterati Seek Justice For Victim (Photo Credits: Twitter)

पीडितेने आत्महत्या केली नसून, तिची हत्या करण्यात आली आहे, असे सांगत पीडितेच्या कुटुंबीयांनी पीडितेचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याशिवाय आपण मृतदेह स्वीकारणार नसल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांचे म्हणने आहे. दरम्यान, या घटनेनंत पोलिसांनी मंगळवारी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात बिमल भआरवड, दर्शन भारवड, सतिश भारवड आणि जिगर भारवड या चौघांविरोधात प्रथमिक गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील घटनेचा तपास करत आहेत.