मध्य प्रदेशात भाजपने कट्टर हिंदुत्त्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांचे तिकीट कापले होते. यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी जाहीरपणे नाराजीही बोलून दाखवली होती. त्याच साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. साध्वी प्रज्ञा या 2008 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील (Malegaon Blast) आरोपी आहेत. या प्रकरणात आता न्यायालयाने पुन्हा एकदा त्यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. मुंबईतील राष्ट्रीय तपासयंत्रणेच्या विशेष न्यायालयाने (NIA) साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरोधात वॉरंट जाहीर केले आहे. साध्वी प्रज्ञा या मालेगावर बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीला न्यायालयात गैरहजर होत्या. (हेही वाचा - MP: 'मोदीजींना माझे शब्द आवडले नसावेत', भोपाळमधून तिकीट नाकारल्यानंतर भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांची व्यथा)
साध्वी प्रज्ञा या अंतिम जबाब नोंदणी प्रक्रियेला गैरहजर राहत आहेत. त्यामुळे या खटल्याचा निकाल लागण्यास विलंब होत असल्याची तक्रार इतर आरोपींनी केली आहे. त्याची दखल घेत विशेष न्यायालायने साध्वी प्रज्ञा यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. 10 हजार रुपयांच्या या जामीनपात्र वॉरंटची येत्या 20 मार्चपर्यंत अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
भाजपने भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मी 2019 मध्येही उमेदवारी मागितली नव्हती आणि आतादेखील मागितलेली नाही, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले होते. तसेच मी ज्या शब्दांच वापर केला ते शब्द पीएम मोदींना आवडले नसतील, असे असू शकते. ते म्हणाले होते मला माफ करणार नाही. मात्र, मी त्यांची माफी मागितली होती. असे देखील त्यांनी म्हटले होते.