New SEBI Chairman Tuhin Kanta Pandey

केंद्र सरकारने तुहिन कांत पांडे (Tuhin Kanta Pandey) यांची सेबीचे (SEBI) पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. या ठिकाणी ते माधबी पुरी बुच यांची जागा घेतील. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने (DoPT) पांडे यांच्या नियुक्तीबाबत अधिसूचना जारी केली आहे. मंत्रिमंडळाने नियुक्तीला मंजुरी दिल्यानंतर जारी केलेल्या पत्रानुसार, 1987 च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी तुहिन कांत पांडे सध्या अर्थ मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत आहेत. नियुक्ती आदेशात सरकारने स्पष्ट केले आहे की, त्यांचा कार्यकाळ पदभार स्वीकारल्यापासून किंवा पुढील आदेश येईपर्यंत तीन वर्षांचा असेल. पांडे हे ओडिशा कॅडरचे वरिष्ठ आयएएस अधिकारी राहिले आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेतही पांडे चर्चेत होते.

जाणून घ्या कोण आहेत तुहिन कांत पांडे-

तुहिन कांत पांडे हे 1987 बॅचचे ओडिशा कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि बर्मिंगहॅम विद्यापीठ, यूके येथून एमबीए केले आहे. पांडे यांनी त्यांच्या कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी संबलपूर जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम केले आहे, तसेच वाणिज्य मंत्रालयात उपसचिव आणि संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटनेत (UNIDO) भूमिका बजावली आहे.

केंद्र सरकारमध्ये, त्यांनी गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे (DIPAM) सचिव म्हणून पाच वर्षे सेवा दिली आहे, जिथे त्यांनी एअर इंडियाच्या खाजगीकरणासारख्या महत्त्वाच्या विनिवेश उपक्रमांचे नेतृत्व केले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या टीमचा महत्त्वाचा भाग असलेले वरिष्ठ नोकरशहा तुहिन कांत पांडे सप्टेंबर 2024 मध्ये अर्थ सचिव बनले.

केंद्र सरकारच्या विभागांमध्ये सामील होण्यापूर्वी, तुहिन कांत पांडे यांनी ओडिशा सरकारच्या आरोग्य, सामान्य प्रशासन, व्यावसायिक कर, वाहतूक आणि वित्त विभागांमध्ये प्रशासकीय प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. ओडिशा राज्य वित्त महामंडळाचे कार्यकारी संचालक असलेले पांडे हे त्यांच्या नोकरशहा म्हणून असलेल्या प्रशासकीय कारकिर्दीत ओडिशा लघु उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकही बनले. (हेही वाचा: Wealth Gap In Indian Economy: देशातील तब्बल 90 टक्के लोकांकडे अतिरिक्त खर्च करण्यासाठी पैसे नाहीत; 10 % लोक चालवत आहेत अर्थव्यवस्था- Indus Valley Annual Report

सेबी प्रमुख पद-

दरम्यान, सेबी प्रमुख हे पद खूप महत्त्वाचे आहे. कारण या पदावरील व्यक्ती शेअर बाजारावर देखरेख करते. गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे ही त्यांची जबाबदारी आहे. सेबीच्या प्रमुखांना भारत सरकारच्या सचिवांच्या पगाराइतका पगार मिळतो. घर आणि गाडीशिवाय हा पगार दरमहा 5,62,500 रुपये आहे. पांडे यांना आर्थिक बाबींची सखोल समज आहे. त्यांना प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवही आहे. अशा परिस्थितीत, त्यांच्या नियुक्तीमुळे बाजारपेठेत स्थिरता येईल अशी अपेक्षा आहे. कारण याधीच्या सेबी प्रमुख माधबी यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला आहे. हिंडेनबर्ग अहवाल बाहेर आल्यानंतर, विरोधी पक्षांनी माधबी यांना डचणीत आणले होते.