नवे संसद भवन (New Parliament Building) येत्या 28 मे (रविवार) रोजी भारताला अर्पण केले जाईल. विद्यामान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांच्या नेतृत्वाखाली नव्या संसद भवनाचा उद्घाटन समारंभ पार पडेल. दरम्यान, या उद्घाटन समारंभाचा तपशील अद्याप तरी अधिकृतपणे जाहीर केला गेला नाही. मात्र, वृत्तसंस्था एएनआयने विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तामध्ये उद्घाटन समारंभाबाबत काही तपशील पुढे आला आहे. जो आम्ही इथे देत आहोत. नव्या संसद भवनामुळे पुरातन वास्तू असलेली भारताची जुनी संसद इमारत आता केवळ पर्यटनाचे निमित्त राहील.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, नव्या संसद भवनाचा कार्यक्रम दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. सूत्राच्या आधारे दिलेल्या या वृत्तात वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, उद्घाटन समारंभ विधी मुख्य समारंभाच्या आधी सकाळपासूनच सुरु होतील. हा समारंभ गांधी पुतळ्याजवळ भव्य मंडप उभारुन सुरु केला जाण्याची शक्यता आहे. तसेच, पंतप्रधान मोदी, लोकसभा अध्यक्ष, ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश आणि सरकारमधील काही ज्येष्ठ मंत्री या सोहळ्याचा भाग असण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Center's Action on Indian Cough Syrup: भारतीय कफ सिरपवर केंद्राची कारवाई, सरकारी लॅबमध्ये चाचणी केल्यानंतरच होणार निर्यात; 1 जूनपासून नवीन नियम लागू)
सकाळच्या पूजेनंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर संसदेचे वरीष्ठ सभागृह राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह लोकसभा या दोन्ही सभागृहांची पाहणी करतील. त्यानंतर पवित्र अशा सेंगोल (Sengol) लोकसभा दालनात अध्यक्षांच्या खुर्चीशेजारी काही विधी पार पडलील. त्यासाठी तामिळनाडूचे काही पूजारी आणि मूळ ज्वेलरही उपस्थित राहतील. नवीन संसद भवनाच्या आवारात प्रार्थना समारंभही आयोजित केला जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे.
नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाचा पहिला टप्पा सकाळी 9.30 वाजता संपेल. त्यानंतर लगेचच दुसरा टप्पा सुरु होईल. हा टप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लोकसभा सभागृहामध्ये राष्ट्रगीत गायनाने सुरु होईल. त्यानंतर या टप्प्यात, राज्यसभेचे उपसभापती, हरिवंश यांचे भाषण होईल, ते राज्यसभेचे अध्यक्ष, जगदीप धनकर यांच्या वतीने लिखित अभिनंदन संदेश वाचतील. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा लेखी संदेशही वाचून दाखवण्यात येणार आहे, असे समजते. शिवाय लोकसभा अध्यक्ष भाषण करण्याची शक्यता आहे आणि नवीन संसदेच्या बांधकामाची प्रक्रिया, इमारत आणि त्याचे महत्त्व याविषयी बोलण्यासाठी उपस्थित मान्यवरांसाठी दोन लहान ऑडिओ-व्हिडिओ फिल्म्सही दाखवल्या जाऊ शकतात.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्यालाही यावेळी भाषण करता यावे यासाठी स्लॉट ठेवण्यात आला आहे. तथापि, काँग्रेस पक्षासह अनेक विरोधी पक्षांनी उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकल्याची घोषणा केल्याने LoP मल्लिकार्जुन खर्गे रविवारी समारंभाला उपस्थित राहण्याची शक्यता नाही अशी माहिती आहे.
पंतप्रधान मोदी ऐतिहासिक प्रसंगी एक नाणे आणि शिक्के देखील जारी करणार आहेत आणि त्या प्रसंगी त्यांचे भाषण देखील करणार आहेत ज्यानंतर लोकसभेचे सरचिटणीस समारंभाच्या समारोपाचे आभार मानणार आहेत, सूत्रांनी एएनआयला सांगितले.