Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणूनंतर (Coronavirus) आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने (New COVID-19 Strain) धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. हा स्ट्रेन सध्याच्या कोरोनापेक्षा मोठ्या प्रमाणात संसर्गजन्य असल्याने या स्ट्रेनबाबतची भीतीही वाढत आहेत. बघता बघता या स्ट्रेनने भारतामध्ये शिरकाव केला आहे. ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनमुळे देशातील एकूण 25 जणांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली. मंत्रालयाने म्हटले आहे की या 25 संक्रमित लोकांमध्ये, मंगळवारी आणि बुधवारी नवीन प्रकारच्या विषाणूची लागण झालेल्या 20 रूग्णांचा समावेश आहे.

सुरुवातीला मंगळवारी ही संख्या 6 होती, त्यानंतर बुधवारी ही संख्या 20 वर पोहोचली. आता गुरुवारी आणखी पाच रुग्णांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. या सर्व रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. दिल्लीत नवीन विषाणूची लागण झालेले चार रुग्ण आढळले आहेत. नवीन कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे दिल्ली सरकारने गुरुवारी, नवीन वर्षाच्या संध्याकाळी आणि 1 जानेवारी 2021 च्या रात्री राजधानीत रात्र कर्फ्यू लागू केला.

मंत्रालयाने म्हटले आहे की, 25 रुग्णांमध्ये या नव्या स्ट्रेनची पुष्टी झाल्यांनतर आता त्यांच्या संपर्कात आलेले इतर लोक व त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेतला जात आहे. मंत्रालयाने मंगळवारी सांगितले होते की, सध्या परिस्थितीबाबत दक्षता घेतली जात आहे. तसेच मॉनिटरिंग, प्रतिबंध, तपासणी व नमुने INSSCOJ प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी राज्यांचा निर्देश देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात यूकेमधून भारतात आलेल्या लोकांची आरटी पीसीआर चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. पॉझिटिव्ह आल्यावर नवीन स्ट्रेनच्या तपासणीसाठी नमुने जीनोम सिक्वनिंगसाठी प्रयोगशाळेत पाठविले जात आहे. सध्या यूकेवरून येणारी विमाने 7 जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत.

दरम्यान, ब्रिटनमध्ये प्रथम सापडलेला कोरोना विषाणूच्या या नव्या स्ट्रेनची पुष्टी भारतासह डेन्मार्क, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबनॉन आणि सिंगापूर अशा देशांमध्ये झाली आहे