Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

ब्रिटनमध्ये (United Kingdom) सापडलेल्या कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेननी (New COVID-19 Strain) भारतामध्ये शिरकाव केला आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार देशात आतापर्यंत नवीन स्ट्रेनच्या 20 हून अधिक घटना समोर आल्या आहेत. या स्ट्रेनबाबत जवळजवळ प्रत्येक राज्य काळजी घेत आहे. मात्र आता यामध्ये अजून एका चिंतेची भर पडली आहे. अलीकडेच युनायटेड किंगडमहून दिल्लीला परतलेली एंग्लो-इंडियन महिला राजधानीमधील आयसोलेशन सेंटरमधून पळाली होती. या महिलेला आंध्र प्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले होते. आता माहिती मिळत आहे की या महिलेमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबर रोजी ब्रिटनहून भारतात आलेल्या या महिलेला दिल्लीच्या आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र अधिकाऱ्यांना चकवा देत आपल्या मुलासह ही महिला पळून गेली व रेल्वेने ती आंध्र प्रदेशला पोहोचली. आंध्र प्रदेशमध्ये तिला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तिचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते व आता या महिलेमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला आहे. या महिलेसोबत त्याच एसी कोचच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या 8 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, या सर्वांचे रिझल्ट्स नकारात्मक आले आहेत.

हैदराबादच्या सेन्टर फॉर सेल्युलर अणि आण्विक जीवशास्त्र (सीसीएमबी) च्या अहवालाचा हवाला देत राज्य आरोग्य आयुक्त कतमनेनी भास्कर यांनी सांगितले की, यूकेमधून परत आलेल्या 12 प्रवाश्यांमध्ये कोरोना संसर्गाची पुष्टी झाली आहे आणि त्यापैकी फक्त याच महिलेमध्ये नवीन स्ट्रेन आढळला आहे. भास्कर म्हणाले की, आंध्र प्रदेशात ब्रिटनमाधीन नवा स्ट्रेन पसरल्याचा पुरावा अद्याप मिळालेला नाही. ब्रिटनमधील या एका महिलेमुळे आंध्र प्रदेशात नवीन स्ट्रेन पसरलेला नाही. या महिलेसोबत प्रवास करणाऱ्या तिच्या मुलाचा अहवाल नकारात्मक आला आहे. (हेही वाचा: UK विमान वाहतुकीवर 7 जानेवारी 2021 पर्यंत बंदी: हरदीपसिंग पुरी)

दरम्यान, अलिकडच्या काळात 1432 लोक ब्रिटनहून राज्यात आले होते आणि त्यापैकी 1406 जणांचा शोध घेण्यात आला आहे. या लोकांच्या जीनोम तपासणीसाठी हैदराबाद येथील सीसीएमबीकडे सर्व नमुने पाठवले आहेत.