NEET Result 2021 मागील अनेक दिवसांपासून रखडला होता पण आता त्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला आहे. आज (28 ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायाल्याने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (NTA) नीट परीक्षेचा निकाल (NEET Exam Details) जाहीर करण्याचे आदेश दिले आहे. सोबतच महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या बॉम्बे हायकोर्टाच्या (Bombay High Court) आदेशाला स्थगिती दिली आहे. ज्या दोन विद्यार्थ्यांमुळे नीट परीक्षेचा निकाल रोखण्यात आला होता, त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्यात येईल असे एनटीएने सर्वोच्च न्यायालयाला (Supreme Court) सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आज एल नागेश्वर राव, संजीव खन्ना आणि बी. आर. गवई या खंडपीठाने विशेष नोटीस जारी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 20 ऑक्टोबर 2021 च्या आदेशाला NTA ने सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लीव्ह पीटीशनच्या माध्यमातून आव्हान दिले होते. चुकीच्या उत्तरपत्रिका दिल्यामुळे महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्या असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. दरम्यान या दोघांच्या परीक्षा झाल्याशिवाय निकाल जाहीर करता येणार नसल्याने यंदा नीट परीक्षेच्या निकालाला उशीर होत आहे.
आज सर्वोच्च न्यायालयाने बॉम्बे हाय कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देत नीट परीक्षेच्या निकालाचा मार्ग मोकळा करून दिला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची चूक नसल्याने त्यांच्यावर अन्याय न होऊ देता निकाल जाहीर केला जावा, असे एनटीएला सांगण्यात आले आहे. तसेच दोन विद्यार्थ्यांच्या प्रकरणावर नंतर सुनावणी घेतली जाईल असे देखील स्पष्ट केले आहे. (नक्की वाचा: MPSC Subordinate Service for Group B Prelims 2021: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 अंतर्गत 666 पदांसाठी 26 फेब्रुवारीला परीक्षा).
नीट परीक्षा यंदा 12 सप्टेंबरला झाली आहे. 202 शहरांमध्ये 3682 केंद्रांवर सुमारे 16,14,777 जणांनी परीक्षा दिली आहे. आता येत्या काही दिवसांतच NEET 2021 चा निकाल आणि स्कोअर कार्ड neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला जाईल.