NEET Paper Leak Case: नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणी CBI द्वारा पहिला FIR दाखल
NEET Paper Leak Case | (Photo credit: archived, edited, representative image)

केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने NEET-UG परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणात पहिला प्रथम माहिती अहवाल म्हणजेच एफआयआर (CBI Registers FIR in NEET-UG Exam Paper Leak Case) दाखल केला आहे. उल्लेखनीय म्हणजे या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे स्वीकारल्यानंतर एकाच दिवसात रविवारी (23 जून) एफआयआर नोंदवला गेला आहे. भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 420 (फसवणूक) आणि 120B (गुन्हेगारी कट) अन्वये हा एफआयआर नोंदवला गेला आहे.

शनिवारी आदेश रविवारी थेट FIR

पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी NEET परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपर फुटल्याप्रकरणी केंद्र सरकारने सीबीआय चौकशीचे आदेश शनिवारी (22 जून) दिलेहोते. त्यानंतर अवघ्या एकाच दिवसात सूत्रे वेगाने हालली आणि हा एफआयआर दाखल झाला आहे. शिक्षण मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून म्हटले आहे की, "NEET परीक्षाबाबत कथित अनियमितता/फसवणूक/तोतयागिरी/गैरव्यवहाराची काही प्रकरणे नोंदवली गेली आहेत. पारदर्शकतेसाठी, मंत्रालयाने सर्वसमावेशक तपासासाठी हे प्रकरण CBI कडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे." (हेही वाचा, NEET Paper Leak Latur Connection: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे लातूर कनेक्शन, दोघे एटीएसच्या ताब्यात; बिहारनंतर महाराष्ट्रात खळबळ)

NTA च्या महासंचालकांची गच्छंती

NEET-UG 2024 आणि UGC-NET सारख्या प्रवेश परीक्षांमधील कथित अनियमिततेच्या देशव्यापी वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सध्याचे महासंचालक सुबोध सिंग यांच्या जागी वरिष्ठ अधिकारी प्रदीप सिंह खरोला यांची नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे नवीन प्रमुख म्हणून शनिवारी नियुक्ती केली. खरोला हे इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) चे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष देखील आहेत. त्यांच्याकडे आता एनटीएचे नवीन संचालकाची नियुक्ती होईपर्यंत NTA चे नेतृत्व करण्याची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (हेही वाचा, NEET Paper Leak Case: NTA महासंचालक सुबोध कुमार सिंह यांची पदावरुन हकालपट्टी)

NEET-UG प्रचंड टीका आणि आरोप

एनटीए, NEET-UG परीक्षा आयोजित करतात. या परीक्षांतील सर्व बऱ्यावाईट गोष्टींसाठी ही संस्था जबाबदार आहे. या संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला आहे. या परीक्षेच्या निष्पक्षततेबद्दल देशभर संशय घेतला जात असून मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरु झाले आहे. त्यामुळे ही संस्था आणि पर्यायाने केंद्र सरकारलाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहावे लागले आहे. आक्रमक विद्यार्थी आणि पालकांनी एनटीए बरखास्त करण्याच्या मागणीसाठी देशभरात निदर्शने केली. (हेही वाचा, NEET, UGC-NET Controversies: एनईईटी, यूजीसी-नेट परीक्षा वादानंतर केंद्राचा मोठा निर्णय, Public Examinations Act, 2024 लागू)

एक्स पोस्ट

दरम्यान, विद्यार्थ्यांची आंदोलने सुरु असतानाच ​​67 उमेदवारांनी NEET-UG परीक्षेत 720 पैकी 720 गुण मिळवल्याचा प्रकार पुढे आला आणि हा गोंधळ आणखीच वाढला. त्यानंतर केंद्र सरकार खडबडून जागे झाले आणि त्यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने परीक्षांची निष्पक्षता राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर जोर दिला. हा जोर देताना म्हटले की, कोणतीही व्यक्ती किंवा संस्था यांचा यात सहभाग आढळल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.