Supriya Shrinate यांनी Kangna Ranaut बाबत केलेल्या टीपण्णीवर NCW कडून निवडणूक आयोगाला पत्र
NCW (File Image)

अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut )बद्दल आक्षेपार्ह टीपण्णी करणारी पोस्ट कॉंग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत (Supriya Shrinate) यांना भोवली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं असून महिलांचा सन्मान राखलाच गेला पाहिजे असं म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाच्या चेअरपर्सन रेखा शर्मा यांनी हे पत्र लिहलं आहे.

कंगना रणौतला भाजपा कडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या सोशल मीडीया अकाऊंट वरून तिचा एक बोल्ड अंदाजातील फोटो शेअर करत पोस्ट करण्यात आली होती. या पोस्ट वरून वाद सुरू होताच सुप्रिया श्रीनेत यांनी तो हटवला देखील आहे. या पोस्ट नंतर कंगना कडूनही प्रतिक्रिया सोशल मीडीयाच्या माध्यमातून समोर आली आहे. 'मी कर्तृत्त्वान महिलांपासून वेश्या व्यवसायातील महिला आणि अगदी भोळी असा विविध भूमिका पडद्यावर साकारल्या आहेत. मुलींना पूर्वग्रहाच्या जोखडातून मुक्त केले पाहिजे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचा अपमान करणं थांबवल पाहिजे. प्रत्येक स्त्रीचा सन्मान ठेवला गेला पाहिजे असा पलटवार कंगनाने केला आहे.

पहा कंगनाची पोस्ट

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी कंगना रणौतला भाजपाने मंडी मधून तिकीट दिले आहे. त्यामुळे या निवडणूकीतून तिचा सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश होणार आहे. कंगना आपल्या थेट, बेधडक वक्तव्यांसाठी, भूमिकांसाठी चर्चेत असते.

सुप्रिया श्रीनेत यांनी शेअर केलं स्पष्टीकरण

दरम्यान सुप्रिया श्रीनेत यांनी व्हिडिओ पोस्ट करत आपल्या फेसबूक सह अन्य सोशल मीडीया हॅन्डल्सचा अ‍ॅक्सेस अनेकांकडे आहे. त्यापैकी कुणी ही पोस्ट केली असेल. माझा या पोस्टशी संबंध नसून महिलांप्रति आपणही आदर ठेवतो असं म्हणत त्यांनी या प्रकरणातून हात वर केले आहेत.