Maoist | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Naxals Support To Women Wrestlers: राजधानी दिल्ली येथे कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण सिंग (Brij Bhushan Singh) यांच्यावर कारवाई व्हावी ही मागणी लावून धरत हे कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारकडून या आंदोलनाकडे पूर्ण दूर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारवर टीकेची चौफेर झोड उठली असतानाच हे आंदोलन वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. या आंदोलनाला चक्क नक्षलवाद्यांनी पाठींबा जाहीर केला आहे. 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील कांकेर (Kanker) येथे नक्षलवाद्यांनी एक फलक झळकावला आहे. या फलकाच्या आधारे हा पाठिंबा देण्यात आला आहे.

छत्तीसगड राज्यातील कांकेर येथे जनकपूर ते छोटेबेठिया रस्त्यावर हे बॅनर ठळकपणे प्रदर्शित करण्यात आले. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाई करुन त्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी या बॅनरद्वारे करण्यात आली होती. दरम्यान, नक्षलवाद्यांनी केंद्र सरकारच्या 'बेटी बचाओ बेटी पढाओ' मोहिमेवरही जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारची ही मोहिम म्हणजे निव्वळ ढोंग असल्याचे नक्षलवाद्यांनी बॅनरच्या माध्यमातून म्हटले आहे. (हेही वाचा, FIR Against Brij Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात 2 एफआयआर दाखल; कुस्तीपटूंनी WFI प्रमुखाविरोधात केलेल्या 10 तक्रारींचा तपशील उघड)

दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना अतिशय क्रूर वागणूक दिली. त्यांना फरफटत नेण्यात आले. दरम्यान, या सर्व प्रकारानंतरही कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही मागणी कायम ठेवली आहे. तसेच, कुस्तीपटूंनी आपली पदके गंगेत विसर्जित करण्याचा इशाराही दिला होता. मात्र, टीकैत यांच्या मनधरणीनंतर कुस्तीपटूंनी आपला इरादा मागे घेतला. मात्र, ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारला पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.