Nawab Malik यांचा मुलगा Amir Malik ने वडिलांच्या जामिनासाठी 3 कोटीची मागणी झाल्याचा दावा करत पोलिसात दाखल केली FIR
Nawab Malik | (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik)  यांच्या मुलाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्याच्या दाव्यानुसार, नवाब मलिकांना जामीन हवा असल्यास 3 कोटी देण्याची मागणी झाली आहे. पोलिसांनी याबाबतची माहिती गुरूवार (17 मार्च ) दिवशी दिली आहे. मागील महिन्यात नवाब मलिकांना मनी लॉडरिंग केस (Money Laundering Act)  मध्ये अटक केली आहे. ईडी कडून करण्यात आलेल्या या अटकेनंतर त्यांची रवानगी सध्या मुंबईत आर्थर रोड तुरूंगामध्ये करण्यात आली आहे.

नवाब मलिकांचा मुलगा आमीर मलिक याने या प्रकरणी वी बी नगर पोलिस स्थानकांत तक्रार नोंदवली आहे. काल (16 मार्च) रात्री उशिरा अज्ञाताविरूद्ध ही तक्रार नोंदवण्यात आली आहे.

तक्रारदाराच्या माहितीनुसार त्यांना एक इमेल आला होता. त्यामध्ये इमेल करणार्‍याचे नाव Imtiyaaz सांगण्यात आले आहे. त्याने नवाब मलिकांच्या जामीन मिळवून देण्याच्या कामासाठी बिटकॉईन द्वारा 3 कोटीची मागणी केली आहे.

PTI वृत्तसंस्थेसोबत बोलताना आमीरने या प्रकरणाबद्दल फार माहिती देऊ शकत नाही. यामध्ये गोपनीय बाबी असल्याचं म्हटलं आहे. BMC Election 2022: नवाब मलिक यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईमध्ये नव्या चेहऱ्याच्या शोधात .

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे, ज्यात 419 (व्यक्तीद्वारे फसवणूक केल्याबद्दल शिक्षा), 420 (फसवणूक) आणि आयटी कायद्यातील तरतुदींचा समावेश आहे. पुढील तपास सुरू आहे." फरारी गुंड दाऊद इब्राहिमच्या साथीदारांशी संबंध असलेल्या मालमत्तेच्या व्यवहारावरून नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत.

काही दिवसांंपूर्वी अटकेविरूद्ध कोर्टात जात ईडीने आपणास केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत नवाब मलिक यांनी केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या या संस्थेच्या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागितली होती. आपणास करण्यात आलेली अटक ही कायद्याला धरुन नसल्याचे मलिक यांचे मत होते. मात्र,मुंबई उच्च न्यायालयाने मलिक यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता त्यांना जामिनाची प्रतिक्षा आहे.