केंद्र सरकार कडून दिल्या जाणार्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांमध्ये (National Teachers Awards) यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातून दोन जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची वर्णी लागली आहे. 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचं (Teachers Day) औचित्य साधत दरवर्षी अध्यापन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरकाराने गौरवले जाते. यंदा या पुरस्कारासाठी 44 जणांची निवड झाली आहे त्यात गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील आसरअली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक खुर्शिद शेख (Khurshid Shaikh) आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुका उमरगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबानगर कदोराचे शिक्षक उमेश रघुनाथ खोसे (Umesh Khose) यांचा समावेश आहे.
खुर्शीद शेख हे मुख्याध्यापक आणि उपक्रमशील शिक्षक आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात खास ओळख निर्माण केली असून त्यांनी शिक्षणातील नवनवीन उपक्रमांचा अवलंबन करून जिल्हा परिषद शाळेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. शिक्षणातील नवनवीन उपक्रमांचा अवलंबन करून आपल्या शाळेत महत्त्वपूर्ण बदल घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याने त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
करोना संकटात ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची जोड देऊन मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी झटणार्या उमेस घोसे यांच्या कार्याची देखील दखल घेण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिकता यावे यासाठी खोसे यांनी 51 ऑफलाइन अॅप्स निर्माण केली आहेत. मुलांना त्यांनी तयार केलेल्या व्हिडिओच्या सहाय्याने ऑफलाइन पद्धतीने ऑनलाइन शिक्षण घेता आले आणि कोरोना संकटातही शिक्षण सुरू राहिले. म्हणून त्यांची निवड राष्ट्रीय पुरस्कारामध्ये झाली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातील खुर्शीद शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमेश खोसे यांना जाहीर झाला. या दोन्ही शिक्षकांचं मनःपूर्वक अभिनंदन! या प्रयोगशील शिक्षकांचा अभिमान वाटतो. त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा! pic.twitter.com/w1ufcDLeth
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 19, 2021
दरम्यान काल 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२१' च्या नावांची घोषणा झाली आहे. आमदार रोहित पवार यांनी देखील त्यांचे कौतुक केले आहे.