भाजप, काँग्रेस (संग्रहित प्रतिमा)

2020-21 या आर्थिक वर्षात आठ राष्ट्रीय पक्षांनी (National Parties) एकूण 1,373.783 कोटी रुपयांचे उत्पन्न घोषित केले आहे. वर्षभरापूर्वीच्या कमाईची तुलना केल्यास सर्वच पक्षांच्या कमाईत अनपेक्षितपणे घसरण झाली आहे. यामागे कोरोना महामारी हे एक मोठे कारण असू शकते. पण, या सगळ्यात भाजपला (BJP) सर्वात मोठा झटका बसला आहे, ज्यांच्या उत्पन्नात सर्वाधिक घट झाली आहे. मात्र, तरीही तो सर्व राष्ट्रीय पक्षांत अव्वल आहे. उत्पन्नाच्या बाबतीत काँग्रेस (Congress) दुसऱ्या क्रमांकावर आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) ही आकडेवारी जाहीर केली आहे.

8 पक्षांमध्ये भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सीपीआय, सीपीआयएम, तृणमूल काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) यांचा समावेश आहे, ज्यांना निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात, या 8 राष्ट्रीय पक्षांनी घोषित केलेल्या एकूण 1,373.783 कोटी रुपयांच्या उत्पन्नापैकी, भारतीय जनता पक्षाचा वाटा सर्वात जास्त म्हणजे सुमारे 55 टक्के आहे. एडीआरने एका निवेदनात म्हटले आहे की या 8 राष्ट्रीय पक्षांना 2020-21 या आर्थिक वर्षात संपूर्ण भारतातून हे उत्पन्न मिळाले आहे.

एडीआरने म्हटले आहे की सर्व राष्ट्रीय पक्षांमध्ये भाजपने सर्वाधिक उत्पन्न घोषित केले आहे. 2020-21 मध्ये भारतीय जनता पक्षाचे एकूण उत्पन्न 752.337 रुपये आहे. भाजपनंतर काँग्रेसने मागील आर्थिक वर्षात 285.765 कोटी रुपयांचे उत्पन्न दाखवले आहे, जे या 8 राष्ट्रीय पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या 20.801 टक्के आहे. आर्थिक वर्ष 2019-20 च्या उत्पन्नाशी तुलना केल्यास काँग्रेसच्या उत्पन्नात 58.11% ची घट झाली आहे. काँग्रेसचे त्या वर्षीचे उत्पन्न 682.21 कोटी रुपये होते.

2019-20 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2020-21 मध्ये सर्व पक्षांच्या उत्पन्नात घट झाली आहे. उदाहरणार्थ, टीएमसीचे उत्पन्न 48.20%, एनसीपीचे 59.19%, बीएसपीचे 9.94%, सीपीआयचे 67.65% आणि एनपीपीचे 62.91% नी कमी झाले आहे. पण, उत्पन्नाचा सर्वात मोठा फटका भारतीय जनता पक्षाला बसला आहे. भाजपचे उत्पन्न 2019-20 मध्ये 3,623.28 कोटी रुपये होते, जे 2020-21 मध्ये 752.337 कोटींवर आले आहे. अशाप्रकारे त्यांचे उत्पन्न 79.24% ने घटले आहे. (हेही वाचा: पंतप्रधानांना मित्रों आवाजाशिवाय काहीही ऐकू येत नाही, राहुल गांधींची घणाघाती टीका)

खर्चाबाबत बोलायचे झाले तर, भाजपने सर्वाधिक म्हणजे 421.014 कोटी रुपये निवडणूक आणि सर्वसाधारण प्रचारावर खर्च केले आहेत, दुसऱ्या क्रमांकावर प्रशासकीय खर्च आहे, ज्यामध्ये पक्षाने 145.688 कोटी रुपये खर्च केले आहेत. दुसरीकडे, काँग्रेसने निवडणुकीवर सर्वाधिक 91.358 कोटी रुपये खर्च केले आहेत, त्यानंतर प्रशासकीय खर्च 88.439 रुपये आहेत. निवडणूक प्रचारावरील खर्चात टीएमसी काँग्रेसपेक्षा थोडी मागे आहे, ज्याने 90.419 कोटी रुपये खर्च केले आहेत.