
'नॅशनल हेरॉल्ड' (National Herald Case) प्रकरणात काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांची चौकशी सुरु आहे. 'नॅशनल हेरॉल्ड' प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याच ईडीला संशय आहे. या प्रकरणात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची पाठिमागील दोन दिवसांपासून चौकशी सुरु आहे. काल (14 जून) सुद्धा ही चौकशी रात्री उशीरपर्यंत सुरु होती. रात्री उशीरपर्यंत सुरु असलेली चौकशी संपताच राहुल गांधी थेट रुग्णालयात गेले. तेथे त्यांनी आपल्या मातोश्री सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतली. सोनिया गांधी सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. दरम्यान, आज (बुधवार, 15 जून 2022) सलग तीसऱ्या दिवशीही राहुल गांधी यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
काल चौकशी संपल्यानंतर रात्री 11.30 च्या सुमारास राहुल गांधी ईडी कार्यालयातून बाहेर पडले. त्यांनी रुग्णालयात जाऊन आपली काँग्रेस अध्यक्षा असलेल्या आपल्या मातोश्री सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्या दिल्ली येथील गंगाराम रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. दरम्यान, त्यांनाच 23 जून रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. (हेही वाचा, National Herald Case: राहुल गांधींची सुमारे दहा तास चौकशी, उद्या पुन्हा राहावं लागेल चौकशीसाठी हजर)
ईडीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत सोमवारी 10 तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी केली. त्यानंतर ईडीने त्यांना दुसऱ्यांदा उपस्थित होण्यास सांगितले. राहुल गांधी सलग दुसऱ्या दिवशी सकळी 11 वाजून पाच मिनीटांनी एपीजे अब्दुल कलाम रोड येथील ईडी कार्यालयात पोहोचले होते. या वेळी त्यांची बहिण प्रियंका गांधी यासुद्धा त्यांच्या सोबत होत्या. अधिकाऱ्यांनी म्हटले की, कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर 11 वाजून 30 मिनिटांनी राहुल गांधी यांची चौकशी सुरु झाली. जवळपास चार तासांची चौकशी झाल्यावर दुपारी साधारण तीन वाजण्याच्या सुमारास राहुल गांधी बाहेर आले त्यानंतर एक तासभर विश्रांती घेऊन ते पुन्हा एकदा इडी कार्यालयात पोहोचले.
दरम्यान, काँग्रेसने या चौकशीचा विरोध सुरु केला आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काँग्रेस मुख्यालयालगतच्या परिसरांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि गांधी कुटुंबीय हा ईडीच्या चौकशीचा प्रमुख भाग आहे. यंग इंडियन आणि असोसियेटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) ची भागिदारी पॅटर्न, वित्तीय देवाणघेवाण आणि प्रवर्तकाची भूमिका यांबाबत स्पष्टता आणने यासाठी ईडी सध्या काम करत आहे. यंग इंडियन चे प्रवकर्तक आणिशेअर धारकांमध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेसचे इतर काही सदस्या आहेत. दिल्ली येथील एका कनिष्ट न्यायालयाने यंग इंडियन द्वारा आयकर विभागाच्या चौकशीच्या माहिती घेतल्यानंतर एजन्सीने पीएमपीएलच्या गुन्हे विषयक नियम, कायद्यान्वये एक गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप नेता सुब्रह्मण्यम स्वामी यांनी याबाबत 2013 मध्ये एक याजिका दाखल केली होती.