Nana Patole | (Photo Credits: X)

सांगली लोकसभा मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटलांवर काँग्रेस आता कारवाई करणार, अशी माहिती स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. विशाल पाटील यांची मनधरणी करण्याचे खुप प्रयत्न केलेत. मात्र, त्यांना कुणीतरी फुस लावली आहे. विशाल पाटलांवर कारवाईसाठी प्रदेश काँग्रेसची 25 एप्रिलला बैठक होणार आहे. या बैठकीनंतर विशाल पाटील यांच्यावरील कारवाईचं स्वरूप स्पष्ट होणार आहे. दरम्यान विशाल पाटलांना निवडणुकीसाठी लिफापा हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला शिट्टी हे चिन्ह मिळालय. दरम्यान, विशाल पाटलांना चिन्ह मिळाल्यानंतर भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांच्यावर चोरदार टीका केली. (हेही वाचा - Lok Sabha Election 2024: 'सूरत' लोकसभेवरुन आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरु, राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर मोठा आरोप)

नाना पटोले म्हणाले, विशाल पाटील यांच्यावर कारवाई होईल. पक्षविरोधी कारवाईच्या आधारावर कारवाई करणार आहोत. कोणीतरी त्यांना फूस लावत आहे. 25 तारखेला आमची मिटींग आहे, त्यावेळी त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मतविभाजन करणारी कंपनी होती, तिचे आता काम संपलेलं आहे. लोकांना त्यांच्याबद्दल समजलेलं आहे. लोकांनी आता मतविभानज करायचं नाही. सेक्युलर काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत राहणार आहेत. त्याचे निकाल आपल्याला पाहायला मिळतील.

सांगलीत ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. विशाल पाटलांनी सांगलीची जागा ठाकरे गटाला सुटूनही बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सांगलीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तिरंगी लढतीचा फायदा कोणाला होतो? हे पहावे लागणार आहे.