Rail Neer Water Bottles Viral Video (Photo Credit: Twitter)

मध्य रेल्वेने (Central Railways)  सोमवारी लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) च्या एका चहाच्या स्टॉल मालकाला 50,000 रुपयांचा दंड ठोठावला. या व्यक्तीने रेल्वे नीर पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या 1-लिटर बाटलीसाठी ज्यादा पैसे आकारले होते. या गोष्टीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेकडून ही कारवाई करण्यात आली. 5 नोव्हेंबर रोजी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली होती.

'15 रुपये किमतीच्या पॅकेज केलेल्या पाण्याच्या बाटल्या कोणत्याही भीतीशिवाय 20 रुपयांना विकल्या जात आहेत,' असे ट्विट आयुष कुमार सिंग यांनी केले होते. यामध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, स्टॉल मालकाकडे पाण्याच्या बाटलीची मागणी केली असता त्याने रेल्वे नीर पॅकेज्ड बॉटल दिली व तिचे मूल्य 15 रुपयांच्या ऐवजी 20 रुपये सांगितले. बघता बघता हा व्हिडीओ व्हायरल झाला.

अनेक युजर्सनी या व्हिडीओखाली कमेंट करून, हा प्रकार जवळजवळ सर्व रेल्वे स्थानकांवर घडत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. कोणी दोषी आढळल्यास दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल. या संदर्भात, संबंधित प्राधिकरणाने तपासणी असता, स्टॉल व्यवस्थापक डीलिंग विक्रेत्याचे ओळखपत्र दाखवण्यात अयशस्वी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याच्यावर दंडाची कारवाई केली गेली. (हेही वाचा: ऑपरेशननंतर महिलेच्या पोटात राहिले बँडेज आणि स्पंज, डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल)

दरम्यान, रेलेवे गाड्यांमध्ये रेल्वे नीरऐवजी खासगी कंपन्यांचे पाणी विकले जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत होत्या. आता सोमवारी सकाळी हावडाहून मुंबईला जाणाऱ्या मुंबई मेलमध्ये तपासणीदरम्यान खासगी कंपनीचे पाणी आढळून आले. यावर वाणिज्य विभागाच्या पथकाने हे पाण्याचे 21 बॉक्स रेल्वेतून काढून नष्ट केले.