कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट आ वासून देशासमोर उभे आहे. प्रशासन मोठ्या शर्थीने आपले काम चोख बजावत आहे. मात्र समाजात अजूनही असे अनेक लोक आहेत, ज्यांना या रोगांचे गांभीर्य समजले नाही. याआधी क्वारंटाईन सेंटर (Quarantine Centre) मधील अश्लील नृत्य, गांजा पार्टी यांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. आता असेच दारूवरून बार डान्सर्सनी (Bar Dancers) क्वारंटाईन सेंटरमध्ये धिंगाणा घातला असल्याचे निदर्शनास आले आहे. बार डान्सर्सच्या एका समूहाने मुरादाबाद (Moradabad) मधील त्यांच्या विलगीकरण केंद्रावर आरोग्य अधिकाऱ्यांकडे दारूची मागणी केली आणि त्यांची मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी गोंधळ घातला.
हे बार डान्सर्स आणि त्यांचे साथीदार मुंबईचे (Mumbai) आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बार डान्सर्सनी आरोग्य कर्मचाऱ्यांकडे बिअरची मागणी केली होती आणि ही मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी केंद्राच्या कॉरिडोरमध्ये नृत्य करायला सुरुवात केली. या अलग ठेवण्याच्या केंद्रामध्ये सुमारे पाच दिवसांपूर्वी मुंबईहून मुरादाबादला आलेल्या 72 जणांचा समावेश आहे. या 72 जणांपैकी 5 जणांची कोरोना व्हायरससाठी पॉझिटिव्ह चाचणी आली आहे. 72 व्यक्तींपैकी 12 मुले, 20 पुरुष आणि 40 महिला आहेत. या ठिकाणी हा व्हिडिओ पाहू शकाल.
हे लोक मुंबईच्या मीरा रोड येथून ट्रकमधून मुरादाबादला आले होते. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन मालकाविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे. त्यानंतर या लोकांना विलगीकरण केंद्रामध्ये ठेवले गेले. तिथे या लोकांची बिअरची मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी चक्क नाचण्यास सुरुवात केली. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार बार डान्सर्स आणि त्यांच्या सहयोगींनी आरोग्य अधिकाऱ्यांकडे आपल्याला घरी पाठवा असा हट्टही केला होता. सध्या तरी आरोग्य कर्मचार्यांनी बार डान्सर्सना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, त्यांचे चाचणी अहवाल येईपर्यंत आणि अलग ठेवण्याचा कालावधी संपेपर्यंत त्यांना घरी परत जाऊ दिले जाणार नाही. (हेही वाचा: क्वारंटाईन सेंटरमध्ये अश्लील नृत्यानंतर आता गांजा पार्टी; व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडून तपास सुरु)
बार डान्सर्सपैकी सहा जणांवर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 147, 332, 352, 504, 188 आणि 269 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.