Quarantine Centres: क्वारंटाईन सेंटरमध्ये अश्लील नृत्यानंतर आता गांजा पार्टी; व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडून तपास सुरु
Coronavirus in India (Photo Credits: IANS)

कोरोना विषाणूच्या (coronavirus) संसर्गाच्या भीतीने सध्या संपूर्ण देश चिंतेत आहे. अनेक ठिकाणी लोक स्वतःची काळजी घेऊन घरातच आहेत. शासकीय कर्मचारी जीवाची बाजी लावून आपले काम पार पाडत आहेत. अशात बिहार (Bihar) मधील एका विलगीकरण केंद्रावरील (Quarantine Center) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही रुग्ण चक्क गांजा (Cannabis) पिताना दिसत आहेत. हा व्हिडिओ कटिहार जिल्ह्यातील अहमदाबाद ब्लॉकमधील बैरिया हायस्कूलचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. इथल्या शाळेत सध्या क्वारंटाईन सेंटर उभारले आहे आणि बाहेरून येणाऱ्या लोकांना येथे 14 दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवले जाते.

क्वारंटाईन सेंटरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये विलगीकरण सेंटरमध्ये लोक मजा-मस्ती करताना दिसत आहेत. चैनीच्या नावाखाली मोठ्या आवाजात गाणी ऐकत आहेत आणि गांजा ओढत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, असा दावा केला जात आहे की व्हिडिओमधील एक जण कोरोना पॉझिटिव्ह देखील आहे. आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की, इथे हे प्रकार नेहमीच घडत आहे व याबाबत मारामारीदेखील झाली आहे. सध्या पोलीस या घटनेबाबत तपास करीत आहेत. (हेही वाचा: केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची WHO च्या कार्यकारी मंंडळ अध्यक्षपदी निवड; 22 मे ला स्वीकारणार पदभार)

Bihar Dance Video: क्वारंटाईन सेंटर मध्ये बारबालांच्या नाचण्याचा कार्यक्रम;धक्कादायक व्हिडिओ व्हायरल - Watch Video

पोलिसांनी या सेंटरची तपासणी देखील केली आहे. हा व्हिडिओ नक्की कधीचा आहे याबाबत पोलिसांकडून कोणतीही पुष्टी मिळालेली नाही. क्वारंटाईन केंद्राच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याची ही पहिली घटना नाही, याआधी समस्तीपूर जिल्ह्यातील विभूतिपूर ब्लॉकमधील उमावी कररख गावात क्वारंटिन सेंटरमधील अश्लील नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सरकारद्वारे चालू असलेल्या क्वारंटाईन सेंटरच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे.