Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये (Meerut) आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मेरठच्या देहलीगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरनगर येथील गुलार वाली गली परिसरातील रहिवासी निशा बेगने माजी नगरसेवक असलेला तिचा प्रियकर, सौद फैजी याच्यासोबत आपला 10 वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांच्या मुलीची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सौद फैजी, निशा बेग, साद, आरिफ, कोसर आणि प्रभाग 65 मधील नगरसेवक असलेल्या आणखी एका महिलेला अटक केली आहे.

अटकेनंतर, फैजीने सांगितले की त्यांनी मुलांच्या हत्येनंतर त्यांचे मृतदेह गंगा कालव्यात फेकून दिले होते. त्यानंतर या माहितीवरून मध्यरात्री पोलिसांनी दोन्ही मुलांच्या मृतदेहांचा शोध सुरू केला. माहितीनुसार, लालकुर्ती पेठेतील चपलांच्या दुकानात काम करणारा शाहिद बेग पत्नी निशा बेग, मुलगा मेराब (10) आणि मुलगी कोनेन (6) यांच्यासह राहतो. मेराब सेंट जॉन्स स्कूलमध्ये इयत्ता तिसरीचा विद्यार्थी होता आणि कोनेन सेंट जॉन्स गर्ल्स स्कूलमध्ये इयत्ता दुसरीमध्ये शिकत होती.

बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता ही भावंडे बेपत्ता झाली होती. त्यानंतर गुरुवारी दिवसभर पोलीस मुलांना शोधण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करत होते. तपासावेळी, एका संशयास्पद मोबाईल नंबरच्या चौकशीदरम्यान माजी नगरसेवक सौद फैजी आणि मुलांची आई निशा बेग यांच्यात दीर्घ संभाषण आढळून आले. पोलिसांच्या कारवाईपूर्वीच फैजीला याची माहिती मिळली व तो फरार झाला. यानंतर पोलिसांनी रात्री निशा आणि फैजीच्या तीन नातेवाईकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.

(हेही वाचा: Bihar Shocker: गृहपाठ न केल्यामुळे शिक्षकाची 7 वर्षाच्या मुलाला मारहाण, चिमुकल्याचा मृत्यू)

तासाभरानंतर फैजी स्वत: पोलीस ठाण्यात पोहोचला. यावेळी त्याने निशासोबत लग्न करण्यासाठी आपण दोन्ही मुलांची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. माहितीनुसार, मुलांच्या हत्येपूर्वी सौद फैजी आणि निशा यांनी दोन्ही मुलांचे हात-पाय बांधून त्यांना बेडच्या बॉक्समध्ये ठेवले होते. मुलांची प्रकृती बिघडल्याने दोघांनाही बाहेर काढून त्यांना नशेचे इंजेक्शन देण्यात आले. नंतर त्यांची गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यानंतर मुलांचे मृतदेह गंगा कालव्यामध्ये फेकून दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशा तांत्रिक म्हणूनही काम करते. याआधीही निशाच्या तीन मुलांचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाला आहे. त्या तीन मुलांचीही त्यांच्या आईनेच हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.