Azim Premji (Photo Credits: File Image)

विप्रो (Wipro) या आयटी क्षेत्रातील कंपनीचे मालक अझीम प्रेमजी (Azim Premji) यांनी यावर्षी समाजसेवेसाठी सर्वात मोठे दान केले आहे. प्रेमजी यांनी आर्थिक वर्ष 2020 मध्ये दररोज 22 कोटी रुपये दान केले आहेत, म्हणजे संपूर्ण वर्षात त्यांनी 7,904 कोटी रुपये दान केले आहेत. आर्थिक वर्ष 2020 मध्ये ते सर्वात दानशूर भारतीय (Most Generous Indian 2020) म्हणून उदयास आले आहेत. दान करण्याच्या बाबतीत त्यांनी एचसीएल टेक्नॉलॉजीजचा मालक शिव नादर यांनाही मागे टाकले आहे. प्रेमजींनी मुकेश अंबानीपेक्षा 17 पट अधिक देणगी दिली आहे. अंबानी यांनी या काळात समाज कार्यांसाठी 458 कोटी दिले आहेत. देशातील सर्वात मोठ्या देणगीदारांची यादी हुरुन इंडिया (Hurun India) आणि Edelgive Foundation यांनी बनविली आहे.

प्रेमजी यांनी यापूर्वी 2018-19 या आर्थिक वर्षात 426 कोटी दान केले होते. परंतु यावर्षी त्यांनी सर्व विक्रम मोडले आहेत. यामुळे भारतीय उद्योजकांनी दिलेली आर्थिक देणगी 2020 मध्ये 175% वाढून 12,050 कोटी रुपये झाली आहे. या यादीमध्ये प्रेमजीनंतर दुसरा नंबर एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नादर यांचा आहे. एका वर्षात त्यांनी 795 कोटींची देणगी दिली. त्याचवेळी, आशियाचे सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 458 कोटी दानासह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीत आदित्य बिर्ला समूहाचे कुमार मंगलम बिर्ला चौथ्या तर, पाचव्या क्रमांकावर वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल आहेत.

अजय पिरामल 196 कोटी रुपये दान करून सहाव्या क्रमांकावर आहेत. नंदन नीलकणी आणि हिंदुजा ब्रदर्स अनुक्रमे 196 आणि 159 कोटी रुपयांच्या दानासह सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत. अदानी समूहाचे गौतम अदानी 88 कोटींसह नवव्या क्रमांकावर, तर राहुल बजाज 74 कोटी रुपये देऊन दहाव्या स्थानी आहेत.

यावर्षी कॉर्पोरेट देणगीचा मोठा हिस्सा पीएम केअर फंडातही गेला आहे. यात रिलायन्स इंडस्ट्रीजने 500 कोटी तर आदित्य बिर्ला समूहाने 400 कोटींची देणगी दिली. तसेच टाटा समूहाच्या एकूण देणगीमध्ये पीएम केअर फंडला देण्यात आलेल्या 500 कोटी देणगीचा समावेश आहे. या अहवालानुसार देणगीदारांच्या यादीत मुंबई अव्वल स्थानावर आहे. येथे 36 लोकांनी दान केले आहे. त्यानंतर अनुक्रमे नवी दिल्ली आणि बेंगळुरू यांचा क्रमांक लागतो.