Building | Image of a construction site used for representational purpose | Image: Flickr

कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर जेव्हा आर्थिक घडामोडी रुळावर यायला सुरुवात झाली, तेव्हा रियल इस्टेट क्षेत्रातही तेजी दिसून आली. आताही या नवीन वर्षात अनेक लोकांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न असेल, अशा लोकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. अहमदाबाद (Ahmedabad) हे सध्या आठ प्रमुख गृहनिर्माण बाजारांपैकी सर्वात परवडणारी बाजारपेठ (Most Affordable Housing Market) ठरले आहे. म्हणजेच गुजरातच्या अहमदाबादमध्ये घरे मिळणे सर्वात सोपे आणि स्वस्त आहे. दुसरीकडे, उच्च ईएमआय दर लक्षात घेता, यावेळी मुंबईत (Mumbai) घर घेणे हे सर्वात कठीण आहे.

नाईट फ्रँकने बुधवारी त्यांचा ‘अफोर्डेबिलिटी इंडेक्स 2021 रिपोर्ट’ (Affordability Index 2021) जारी केला. आपल्या अहवालात, त्यांनी म्हटले आहे की भारतीय गृहनिर्माण बाजार परवडण्याच्या बाबतीत दशकातील सर्वोत्तम स्थितीत आहे. अहवालात असेही म्हटले आहे की घराच्या किमती आणि गृहकर्जाचे व्याजदर, सध्या अनेक दशकांमध्ये नीचांकी आहेत. 2021 मध्ये घरांची परवडणारीता सुधारण्यास मदत झाली आहे. अफोर्डेबिलिटी इंडेक्स, एखाद्या विशिष्ट शहरातील गृहनिर्माण युनिटचा EMI भरण्यासाठी कुटुंबाला आवश्यक असलेले उत्पन्न दर्शविते.

म्हणजेच एखाद्या शहरासाठी 40 टक्के निर्देशांक म्हणजे त्या शहरातील कुटुंबांना त्यांच्या गृहकर्जाचा EMI भरण्यासाठी त्यांच्या उत्पन्नाच्या सरासरी 40 टक्के खर्च करावा लागेल. एकूण उत्पन्नाच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त ईएमआय परवडणारे मानले जात नाहीत. नाइट फ्रँकच्या अहवालानुसार, दिल्ली-एनसीआरमधील गृहनिर्माण बाजारपेठेत सर्वाधिक सुधारणा झाली आहे. 2020 चा 38 टक्के निर्देशांक यावर्षी 28 टक्क्यांवर आला आहे. (हेही वाचा: GST Council Meeting: कपड्यांवरील GSTचा दर 5 टक्क्यावर कायम, निर्मला सीतारामन यांची माहिती)

अहवालात म्हटले आहे की, मुंबई वगळता, सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये अफोर्डेबिलिटी इंडेक्स निर्धारित मर्यादेपेक्षा 50 टक्क्यांच्या खाली नोंदवला गेला आहे. अहमदाबाद 20 च्या अफोर्डेबिलिटी इंडेक्ससह देशातील सर्वात परवडणारी गृहनिर्माण बाजारपेठ म्हणून उदयास आले आहे. त्यापाठोपाठ पुणे 24 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईचा अफोर्डेबिलिटी इंडेक्स यावर्षी सर्वाधिक 53 टक्के होता, परंतु 2011 पासून शहराच्या अफोर्डेबिलिटी इंडेक्समध्ये सर्वाधिक सुधारणा झाली आहे. हैदराबादचा 29, बेंगळुरू 26 टक्के तर, चेन्नई आणि कोलकाता या दोघांनी 25 टक्के गुण मिळवले आहेत.