Rains | File image | (Photo Credits: PTI)

सध्या महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक उन्हाळ्याने वैतागले आहेत. काही ठिकाणी आता पूर्व मान्सून सरी आणि अवकाळी पावसामुळे थोडा दिलासा मिळाला असला तरीही आज हवामान खात्याने देशवासियांना एक खूषखबर दिली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा मान्सून (Monsoon) वेळेमध्ये दाखल होणार आहे. 1 जून दिवशी तो केरळ (Kerala) मध्ये हजेरी लावेल असे हवामान खात्याने (IMD) आज स्पष्ट केले आहे. त्यामुळे देशभरातील नागरिकांसाठी आणि प्रामुख्याने बळीराजासाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.

केरळ मध्ये 1 जूनला पाऊस दाखल होण्यासोबतच अजून एक आनंददायी माहिती म्हणजे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधी मध्ये चांगला पाऊस बरसणार असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे. केरळात 1 जूनला पाऊस येणार म्हणजे अपेक्षा आहे की, 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्राच्या कोकणात दाखल होईल आणि पुढे 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात हजेरी लावेल. यंदा नैऋत्य मॉन्सून सामान्य स्थितीच्या 98 टक्के राहील, असा अंदाज आहे. हवामान खातं आता 15 मे आणि 31 मे दिवशी पावसाचा पुढचा अंदाज सांगणार आहे.मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात 6-11 मे दरम्यान गारपीटीसह पावसाची शक्यता; काळजी घेण्याचे रोहित पवार यांचे आवाहन.

हवामान खात्याचा अंदाज

सध्या महाराष्ट्राच्या विदर्भा सह कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज आहे. सोसाट्याचा वारा, पाऊस, वीज आणि गारपीट यांच्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. सातारा सांगली मध्ये मागील काही दिवसांत ऐन उन्हाळ्यात रस्त्यावर गारांचा खच पडलेला पहायला मिळाला आहे. शेतकर्‍यांना सध्या दामिनी अ‍ॅप वर वीजांच्या कडाक्याची माहिती घेऊनच बाहेर पडण्याचा सल्ला दिला जात आहे तर पशूधन सांभाळण्याचेही शेतकर्‍यांना आवाहन करण्यात आले आहे.