प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: IANS)

जग चंद्रावर-मंगळावर जाऊदे, तंत्रज्ञान-विज्ञान क्षेत्रात कितीही प्रगती होऊ दे मात्र समाजाला लागलेले अंधश्रद्धेचे गालबोट कधी पुसले जाणार माहिती नाही. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) दमोह (Damoh) जिल्ह्यात पाऊस पाडण्याच्या नावाखाली सहा अल्पवयीन मुलींना नग्न करून त्यांना गावातून फिरवल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. राज्यातील बुंदेलखंड प्रदेशाच्या या भागात सध्या दुष्काळ आहे. सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये दिसत आहे की, या अल्पवयीन मुली नग्नावस्थेमध्ये चालत आहेत. एक लाकडी काठी त्यांच्या खांद्यावर आहे ज्याला बेडूक बांधलेला आहे.

मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी खूप कमी पाऊस झाला आहे. यामुळे भात पिके सुकू लागली आहेत. जिल्ह्यात चांगला पाऊस पडावा यासाठी, ग्रामीण भागात पारंपारिक युक्त्या अवलंबल्या जात आहेत. अशा अंधश्रद्धा ग्रामीण भागातील लोकांमध्ये इतक्या खोलवर रुजल्या आहेत की, आता चक्क निष्पाप अल्पवयीन मुलींना नग्न करून गावातून फिरवले गेले आहे. हे प्रकरण दमोह जिल्ह्यातील जबेरा तहसील अंतर्गत बनिया गावाचे आहे.

अशा नग्न अवस्थेमध्ये या मुली फिरत खेर मातेच्या मंदिरात आल्या. मंदिरात पोहोचल्यानंतर त्यांनी खेर मातेच्या मूर्तीला शेण लावले. गावातील महिलांनी सांगितले की, असे केल्याने इतका पाऊस पडेल की या प्रतिमेवरील शेण आपोआप धुवून निघेल. या घटनेबाबत मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर, आता दमोहचे एसपी म्हणाले की या प्रकरणाची चौकशी केली जाईल. जर या मुलींना जबरदस्तीने असे फिरवले गेले असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. (हेही वाचा: Uttar Pradesh: लज्जास्पद! काकाचा 7 वर्षीय पुतणीवर बलात्कार, उत्तर प्रदेश येथील घटना)

राष्ट्रीय बाल हक्क आयोगानेही या घटनेवर आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी कोणती कारवाई केले गेली, याबाबत आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे उत्तर मागितले आहे. आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना 10 दिवसांच्या आत मुलींच्या वयाचे प्रमाणपत्रही सादर करण्यास सांगितले आहे.