Coronavirus| Representational Image| (Photo Credits: PTI)

देशभरात कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु याच दरम्यान एक धक्कादायक आकडेवारी मेघालयातून समोर आली आहे. मेघालय (Meghalaya)  येथे एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये जवळजवळ 61 गर्भवती महिला आणि 877 नवजात बालकांनी आपला जीव गमावल्याची माहिती वरिष्ठ आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी असे सांगण्यात आले आहे की, कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी अपुऱ्या वैद्यकिय सेवासुविधा आणि आरोग्य यंत्रणेमुळे ही घटना घडली आहे.

मेघालयात शुक्रवारी कोरोनाच्या आणखी 109 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 59 रुग्णांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मेघालय राज्यात आतापर्यंत एकूण 2239 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 958 रुग्णांची पुर्णपणे प्रकृती सुधारली आहे. तसेच अद्याप 1272 रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु असून 9 रुग्णांचा आतापर्यंत बळी गेला आहे.(भारतात आजपर्यंत 4 कोटींहून अधिक COVID19 च्या चाचण्या पार पडल्याची आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची माहिती) 

दरम्यान, देशात मागील 24 तासांत 76,472 नवे रुग्ण आढळून आले असून 1,021 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 34 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सध्या देशात 34,63,973 कोरोना बाधित रुग्ण असून मृतांचा आकडा 62,550 वर पोहचला आहे. त्यापैकी 7,52,424 अॅक्टीव्ह रुग्ण  असून 26,48,999 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.