गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांनी भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभाग नोंदवला. त्या काही काळ राहुल गांधी यांच्यासोबतही चालल्या. यावरुनच टीका करताना राहुल गांधी यांचा नामोल्लेख टाळत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “काँग्रेसचा एक नेता एका महिलेसोबत पदयात्रा काढताना दिसला. ज्या महिलेने नर्मदा धरण प्रकल्प तीन दशकांपासून रखडवला होता. नर्मदा धरणाला विरोध करणाऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवून तुम्ही पदयात्रा काढत आहात' का?', असे काँग्रेसला ठणकावून विचारा असेही मोदींनी या वेळी म्हटले. गुजरातमधील धोराजी (Dhoraji ) येथे जाहीर सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ राहुल गांधींवरच निशाणा साधला नाही तर नर्मदाविरोधी कार्यकर्त्यांनी हा प्रकल्प कसा रोखून धरला यावर प्रकाश टाकला. त्यांच्या भाषणापूर्वी गुजरातच्या आजी आणि माजी अशा दोन्ही पंतप्रधानांनी नर्मदा बचाव आंदोलावरुन मेधा पाटकर यांच्यावर निशाणा साधला. (हेही वाचा, Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रात शेवटचा दिवस, जाणून घ्या कसा असेल राहुल गांधींचा राज्यातील समारोप मार्ग)
मेधा पाटकर 17 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेत सामील झाल्या. मेधा पाटकर यांच्या खांद्यावर हात ठेवून कार्यकर्त्याशी बोलताना राहुल गांधींचे फोटो पक्षाने (काँग्रेस) ट्विट केले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मेधा पाटकर यांच्या यात्रेतील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आपल्या भाषणात ते म्हणाले, "काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी वेळोवेळी गुजरात आणि गुजराती लोकांबद्दल आपले वैर दाखवले आहे." राहुल गांधी हे गुजरातच्या हिताच्या विरोधात उभे असल्याचा आरोप करून मुख्यमंत्री म्हणाले, "मेधा पाटकर यांना त्यांच्या यात्रेत मध्यवर्ती स्थान देऊन राहुल गांधी दाखवतात की, ज्या घटकांनी गुजरातींना अनेक दशके पाणी नाकारले, त्यांच्या पाठीशी ते उभे आहेत. गुजरात हे सहन करणार नाही."
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीही काँग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले, मेधा पाटकर काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सामील झाल्यामुळे काँग्रेस गुजरातच्या विकासाच्या विरोधात असल्याचे दिसून येते.