कोरोना व्हायरस संकटाशी सामना करणारे भारतीय आता पुन्हा जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्तर भारतामध्ये मर्यादित स्वरूपात आणि विशेष नियमावलीच्या अंतर्गत प्रार्थनास्थळ पुन्हा करण्यात आली आहेत. यामध्ये अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वैष्णव देवी मंदिराचादेखील समावेश आहे. सध्या वैष्णव देवी मंदिर प्रशासनाने (Shri Mata Vaishno Devi Shrine Board) देव आणि भाविकांमधील नातं जपण्यासाठी ऑनलाईन दर्शनाची सोय खुली करून दिली आहे. सोबतच आता भारतातील वैष्णवदेवीच्या भाविकांसाठी 72 तासांत प्रसाद घरपोच पोहचवण्यासाठी विशेष सुविधा खुली आहे. त्यासाठी मंदिराने पोस्ट विभागाची (Postal Department) मदत घेतली आहे. दरम्यान maavaishnodevi.org या मंदिराच्या अधिकृत वेबसाईटवर ही सोय उपलब्ध करण्यात आली आहे.
श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्ड चे सीईओ रमेश कुमार जांगिड यांनी आज दिलेल्या माहितीनुसार, जो भक्त ऑनलाईन पूजा बूक करेल त्याच्या नावाने पूजा करून प्रसाद 72 तासांत भारतामध्ये घरी पोहचवला जाईल. प्रसादामध्ये 3 पॅकेज असतील. 500 रूपयांपासून त्याची सुरूवात असेल तर कमाल 2100 रूपये त्यासाठी आकारले जाणार आहेत. भक्तांना पॅकेजचे बुकिंग करून ऑनलाईन पेमेंट करावे लागणार आहे. त्यानंतर प्रसाद घरी पाठवला जाईल.
श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्ड घरपोच प्रसाद कसा मिळवाल?
- maavaishnodevi.org या वैष्णव देवी मंदिर प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- रूपये 500,1100 आणि 2100 असे तीन पॅकेज उपलब्ध आहे. तुमच्या सोयीनुसार ते निवडा.
- तुमच्या नावाने पूजा विधी केले जातील.
- त्यानंतर 72 तासांच्या अवधीमध्ये प्रसाद घरी पाठवला जाईल.
Booking can be done on our website, three packages available. When a devotee makes booking, puja is performed in their name & prasad is packed. We've made agreement with Postal Dept. Prasad is dispatched within 72 hrs: Ramesh Kumar Jangid, CEO Shri Mata Vaishno Devi Shrine Board https://t.co/DeuixuWRMq pic.twitter.com/deWFnwr4wU
— ANI (@ANI) September 28, 2020
maavaishnodevi.org वर भाविकांना अधिक आणि सविस्तर माहिती उपलब्ध आहे. तुमच्या शंकांचं निरसन 0-9906019475 या नंबरवर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत केले जाईल. जम्मू कश्मीरच्या त्रिकुट पर्वत रांगांवर हे वैष्णव देवीचं संस्थान आहे. दरम्यान कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सध्या मर्यादीत लोकांना तेथे जाण्याची परवानगी आहे.
कोरोना संकटापूर्वी दरवर्षी सुमारे 2.40 कोटी भाविक तेथे हजेरी लावत होते. ऑगस्ट महिन्यात सुमारे 4 महिने मंदिर बंद ठेवल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. सध्या जम्मू कश्मीर व्यतिरिक्त इतर ठिकाणांहून येणार्यांना कोविड 19 ची टेस्ट देऊनच मंदिरात प्रवेश दिला जात आहे.