जातीय हिंसाराने धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये (Manipur Voilance)  आज लोकसभेचे मतदान (Lok Sabha Election) होत आहे. मणिपूरमधील लोकसभेच्या (Manipur Lok Sabha) दोन जागांवर आज मतदान सुरू आहे. अशातच मतदानावेळी गोळीबार झाल्याच्या घटना घडली आहे. या ठिकाणी ईव्हीएमचीही तोडफोड झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे.  मणिपूरमधील (Manipur) मोइरांग भागातील थामनपोकपी येथील एका मतदान केंद्राजवळ समाजकंटकांच्या एका गटाने अनेक राऊंड गोळीबार केला. या घटनेचा व्हिडिओ हा सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.  इंडिया टूडेने या गोळीबारच्या घटनेचे वृत्त दिले आहे.  (हेही वाचा - West Bengal Lok Sabha Election 2024: कूचबिहारमधील मतदान केंद्रावर CRPF जवानाचा मृत्यू; वॉशरूममध्ये आढळला मृतदेह)

पाहा व्हिडिओ -

या  गोळीबारामुळे मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या मतदारांमध्ये एकच खळबळ उडाली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गोळीबाराच्या आवाजात लोक मतदान केंद्राबाहेर पळताना दिसत आहेत. या गोळीबारात ३ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येतआहे. त्याचबरोबर एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, इतर काही ठिकाणीही अशा प्रकारे हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. इनर मणिपूर लोकसभा मतदारसंघांतर्गत थोंगजू विधानसभा मतदारसंघात स्थानिक लोक आणि अज्ञात हल्लेखोर यांच्यात मारामारी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

मणिपूरमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 15.44 लाखांहून अधिक मतदारांपैकी सुमारे 28.19 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या पहिल्या दोन तासांत, अंतर्गत मणिपूर मतदारसंघात 29.40 टक्के मतदान झाले, तर बाह्य मणिपूरमध्ये 26.02 टक्के मतदान झाले. बाह्य मणिपूर आणि अंतर्गत मणिपूरच्या काही भागांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान होत आहे.