रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न (Photo Credit : ANI)

दिल्लीतील कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संशयित रुग्णाने आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केल्याची घटना आज घडली आहे. शहरातील सफदरजंग रुग्णालयाच्या (Safdarjung Hospital) तिसर्‍या मजल्यावरील खिडकीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न या रुग्णाने केला. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या दिल्ली फायर सर्व्हिसच्या कर्मचार्‍यांनी हा प्रयत्न हाणून पाडला व या रुग्णाला ताब्यात घेतले. या रुग्णाला ऑर्थोपेडिक समस्या असून तो मनोरुग्ण आहे. या व्यक्तीला सुखरूप वाचविल्यानंतर त्याला वॉर्डात हलविले आहे. सफदरजंग रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, बीएन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णासोबत त्याचे नातेवाईक उपस्थित नव्हते.

पहा व्हिडिओ -

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली फायर सर्व्हिसच्या कंट्रोल रूममध्ये आज दुपारी तीनच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. एक रुग्ण सफदरजंग रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील वॉर्डाच्या खिडकीतून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगत होता आणि जर कोणी त्याच्या जवळ आला तर तो स्वतःचे मनगट कापून घेईल अशी धमकी देत होता. याबाबत माहिती मिळताच दिल्ली फायर सर्व्हिसची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्याची सुटका करण्यात आली. त्यानंतर रुग्णाला पुन्हा हाडांच्या विभागात दाखल केले गेले.

(हेही वाचा: Coronavirus: कोरोना विषाणूच्या संशयित रुग्णाची दिल्ली येथे आत्महत्या; सफदरजंग रुग्णालयाच्या इमारतीतून मारली उडी)

यादरम्यान अधिकारी जेव्हा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा तो अधिकाऱ्यांवर थुंकत होता. दरम्यान याआधी मार्चमध्ये दिल्लीच्या, सफदरजंग रुग्णालयाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारुन एका व्यक्तीने आत्महत्या केली होती. हा रुग्ण कोरोना विषाणूचा संशयित रुग्ण होता. तनवीर सिंह (Tanveer Singh) असे त्याचे नाव असून, तो 35 वर्षांचा होता. सिडनीहून एअर इंडियाच्या विमानाने हा तरुण भारतात परत आला होता. विमानतळावर झालेल्या तपासणीमध्ये त्याच्यामध्ये कोरोना विषाणू बाबतीत  संशयास्पद लक्षणे आढळली होती.