इंडिगो विमानातील प्रवाशाकडून महिला क्रू मेंबरचा विनयभंग, अमृतसर विमानतळावर अटक
Indigo Flight (PC - Wikimedia Commons)

इंडिगो विमानातील (Indigo) एका प्रवाशाला महिला क्रू मेंबरचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राजिंदर सिंग असे आरोपीचे नाव असून तो दुबईहून अमृतसरला फ्लाइट क्रमांक 6E 1428 ने जात होता. रविवारी रात्री 8 च्या सुमारास अमृतसर विमानतळावर उतरताच त्याला अटक करण्यात आली. पंजाबमधील जालंधरमधील कोटली गावातील रहिवासी असलेल्या अटक करण्यात आलेल्या प्रवाशाने फ्लाइटमध्ये मोठ्या प्रमाणात अल्कोहोल प्यायले होते. मद्यधुंद अवस्थेत त्याने महिला क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केले.

त्यावेळी विमानातील कर्मचाऱ्यांनी परिस्थिती हाताळली. उतरल्यानंतर सुरक्षा व्यवस्थापकाने हा मुद्दा पोलिसांसमोर मांडला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरू आहे.

विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून आक्षेपार्ह वर्तन करण्याच्या घटना गेल्या काही महिन्यांपासून नित्याच्या झाल्या आहेत. अशा घटना वाढत असल्याने विमान कंपन्यांची डोकेदुखी देखील वाढली आहे.

गेल्या महिन्यात, न्यू यॉर्क-नवी दिल्ली अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमधील एका भारतीय व्यक्तीने, कथितरित्या दारूच्या नशेत, वादाच्या वेळी दुसर्‍या प्रवाशाला लघवी केली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या अशाच एका प्रकरणात, शंकर मिश्रा नावाच्या एका व्यक्तीवर एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये मद्यधुंद अवस्थेत असताना एका वृद्ध महिलेवर लघवी केल्याचा आरोप होता. त्याला अटक झाली आणि नंतर जामीन मंजूर झाला.