Mamata Banerjee's Swearing-in Ceremony: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून उद्या तिसऱ्यांदा शपथ घेतील ममता बॅनर्जी; सौरव गांगुलीसह 'या' खास लोकांना असेल निमंत्रण
ममता बॅनर्जी (फोटो सौजन्य- ANI)

पश्चिम बंगाल (West Bengal) विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल कॉंग्रेस (Trinamool Congress) पक्षाने भाजपला (BJP) धूळ चारून पुन्हा एकदा विजयश्री प्राप्त केला आहे. शेवटपर्यंत हा सामना अतिटतीचा होणार असे समजले जात असताना, दिदींनी भाजपला अवघ्या दोन संख्येवर रोखून धरले. आता ममता बॅनर्जी या तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी उद्या सकाळी 10.45 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. कोविड-19 च्या संकटामुळे सलग तिसऱ्यांदा राज्याचा कार्यभार सांभाळणार्‍या ममता बॅनर्जी यांच्या शपथविधी सोहळ्यात फार कमी लोक उपस्थित असतील.

सूत्रांनी सांगितले की, इतर सर्व आमदार कोविड प्रोटोकॉलचे पालन करून 6 आणि 7 मे रोजी शपथ घेतील. कोविड प्रोटोकॉल धान्यात घेऊन दीदींचा शपथग्रहण कार्यक्रम हा अतिशय छोटेखानी समारंभ असणार आहे. शपथ घेण्याचा कार्यक्रम 55 मिनिटांचा असेल. सीएम ममता सकाळी 10.25 वाजता कालिघाट येथील त्यांच्या घरातून शपथविधी कार्यक्रमासाठी रवाना होतील. त्यांच्यासमवेत भाचा अभिषेक बॅनर्जी आणि प्रशांत किशोर उपस्थित असतील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमामध्ये एकूण 13 महत्वाचे लोक सामील होणार आहे. ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, बिमन बोस, दिलीप घोष, अधीर रंजन चौधरी, मनोज तिग्गा, बिमन बॅनर्जी, सुब्रत मुखर्जी, पार्थ चटर्जी, प्रशांत किशोर, अभिषेक बॅनर्जी, देव (दीपक अधिकारी), सौरव गांगुली आणि अब्दुल मन्नान यांचा समावेश असेल. मात्र कॉंग्रेसकडून निमंत्रण पत्र मिळाल्याची पुष्टी मिळालेली नाही. शपथविधीनंतर ममता बॅनर्जी थेट नबन्नाला जातील. ममता बॅनर्जी यांना नबन्नामध्ये गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल. (हेही वाचा: West Bengal Violence: हिंसाचार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्याशी चर्चा)

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसी 292 पैकी 213 जागा जिंकून सलग तिसर्‍या वेळी सत्तेत आली आहे. भाजपने 77 जागा जिंकल्या आहेत. इतरांनी दोन जागा जिंकल्या आहेत.