
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज (Prayagraj) येथे महाकुंभ (Mahakumbh Mela 2025) आयोजित करण्यात आला आहे. तब्बल 144 वर्षांनंतर यावेळी महाकुंभात खास योग घडत आहेत. यंदाचा महाकुंभ 26 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या वेळी गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमात देशभरातून आणि जगभरातून कोट्यवधी भाविक स्नान करत आहेत. अशात देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही या महाकुंभात स्नान करण्यासाठी येणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारीला प्रयागराजला भेट देऊ शकतात. त्यांच्या संभाव्य दौऱ्यात ते अनेक महत्त्वाच्या सरकारी योजनांचा आढावा घेण्याची आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान संगम परिसर आणि परिसरात सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. सर्व तयारी वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
योगी मंत्रिमंडळाची बैठक 22 जानेवारीला प्रयागराजमध्ये महाकुंभ दरम्यान होणार आहे. यानंतर गृहमंत्री अमित शहा 27 जानेवारीला होणाऱ्या महाकुंभात सहभागी होणार आहेत . त्यांच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, ज्यामध्ये संगम स्नान, गंगा पूजन आणि अधिकाऱ्यांच्या भेटीचा समावेश आहे. गृहमंत्र्यांचे आगमन पाहून पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. शहरातील प्रमुख चौक आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी विशेष पाळत ठेवली जात आहे.
त्यानंतर 1 फेब्रुवारी रोजी उपराष्ट्रपती प्रयागराज येथील संगमावर पवित्र स्नान करतील. यासोबतच महामहिम राष्ट्रपती 10 फेब्रुवारीला प्रयागराजला भेट देण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान त्या शहरात आयोजित करण्यात आलेल्या काही प्रमुख कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात. या उच्चपदस्थ नेत्यांच्या आगमनामुळे प्रशासकीय आणि सुरक्षेची तयारी उच्च पातळीवर नेण्यात आली आहे. (हेही वाचा: Maha Kumbh 2025 Hi-Tech: हायटेक महाकुंभमेळा, AI चलित चॅटबॉट्स,जल रुग्णवाहिका, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या देखरेखीमुळे वाढली सुरक्षा; घ्या जाणून)
व्हीआयपींचा दौरा लक्षात घेऊन उत्तर प्रदेश पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. प्रमुख ठिकाणी सुरक्षा दलांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. विशेष सुरक्षा पथके सक्रिय करण्यात आली आहेत. ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पाळत ठेवली जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेच्या प्रत्येक पैलूवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रशासनाने सर्वसामान्यांना सहकार्य करण्याचे आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहनही केले आहे. दरम्यान, पुढील महत्त्वाच्या स्नानाच्या तारखांमध्ये 29 जानेवारी (मौनी अमावस्या- तिसरे शाही स्नान), 3 फेब्रुवारी (वसंत पंचमी- चौथे शाही स्नान), 12 फेब्रुवारी (माघी पौर्णिमा- पाचवे शाही स्नान), आणि 26 फेब्रुवारी (शिवरात्री- सहावे शाही स्नान) यांचा समावेश आहे.