Madhya Pradesh: कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटली; भीषण अपघातात 5 जण जागीच ठार, 2 जखमी
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) राजगढ (Rajgarh) जिल्ह्यात मोठा रस्ता अपघात झाला आहे. गुरुवारी सकाळी राजगढपासून 3 किमी अंतरावर ब्यावरा रोड NH 52 वर हाय-स्पीडमध्ये असणारी ऑटो आणि जीप यांच्या धडकेत एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. प्राथमिक अंदाजानुसार, एका भटक्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटले आणि रिक्षा जीपवर जाऊन आदळली. रिक्षाचा वेग प्रचंड असल्याने ती पथम पलटली व समोरून येणाऱ्या जीपशी तिची धडक झाली.

सर्व मृतक पिपलिया चौकी, हिरण खेडी गावचे रहिवासी होते आणि राजगढ येथील नातेवाईकाच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी जात होते. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले. अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने ऑटो बाहेर काढली. एसपी प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, ऑटो चालक जखमी झाला आहे तर आणि जीप चालक फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

अपघातात पन्ना लाल तंवर, मोर सिंग, प्रभुलाल तंवर, पार्वतीबाई, संत्रा बाई यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या अपघाताबद्दल दु: ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी दिवंगत आत्म्यांना शांती लाभो आणि कुटुंबातील सदस्यांना दु:ख सहन करण्याची शक्ती प्राप्त होवो, अशी प्रार्थना केली. मुख्यमंत्र्यांनी जखमींवर उत्तम उपचार आणि पीडित कुटुंबाला योग्य ती मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान यापूर्वीही येथे रिक्षा प्रवासात 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. चौकी धाडीजवळ बसने एका ऑटोला धडक दिली होती, यामुळे ऑटोमधील 15 जणांचा मृत्यू झाला. हे सर्वजण हिरणखेडी गावातील होते. इतका मोठा अपघात होऊनही गावातून प्रवाशांना ऑटोमधून आणण्यास बंदी घातली नाही, ज्यामुळे पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली.