अगदी फिल्मी स्टाईल चोरीची एक घटना समोर आली आहे. बेंगळुरूला जाणाऱ्या ट्रकमधून चालकाला मारहाण करून त्याला वाहनाबाहेर फेकून, 7 कोटी रुपये किमतीचे सुमारे 9,000 मोबाईल फोन लुटल्याची बातमी आहे. अहवालांनुसार, ही घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) शेओपूर जिल्ह्यात 5 ऑक्टोबर रोजी घडली होती, परंतु उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ओप्पो मोबाईल कंपनीचे व्यवस्थापक सचिन मानव यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलीस अधीक्षक (शहर) मार्तंड प्रकाश सिंह यांनी सांगितले की, ‘ओप्पो मोबाईल कंपनीचे सचिन मानव यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, फर्रुखाबाद जिल्ह्यातील चालक मनीष यादव 5 ऑक्टोबर रोजी ग्रेटर नोएडा येथून फोननी भरलेला ट्रक घेऊन बेंगलोरसाठी निघाला होता. पुढे फराह पोलीस स्टेशन परिसरातील ग्वाल्हेर बायपासवर दोन जण प्रवासी म्हणून वाहनात चढले.’
तक्रारीमध्ये पुढे म्हटले आहे की, ‘ट्रकने झाशीतील बबीना टोल ओलांडताच मध्यप्रदेशातील शेओपूर जिल्ह्यात बदमाशांनी चालकाला बेदम मारहाण केली आणि त्याला वाहनाबाहेर फेकून दिले आणि ट्रक घेऊन पळून गेले. त्यानंतर फोनची चोरी करून मानपूर पोलीस स्टेशन परिसरात रिकामा ट्रक सोडून ते पळून गेले.’
तक्रारदाराने आरोप केला आहे की, त्याने या संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला होता, मात्र त्यांनी त्याठिकाणी तक्रार दाखल करून नकार दिला व मथुरा येथे तक्रार दाखल करण्यास सांगितली. आता आग्रा येथील अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडे तक्रार करण्यात आली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या हा ट्रक मध्य प्रदेशातील मानपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. एसपी म्हणाले की, ट्रकमध्ये 8,990 मोबाईल होते, ज्याची किंमत सुमारे 7 कोटी रुपये होती. (हेही वाचा: Mumbai Cyber Crime: बनावट अश्लील छायाचित्र बनवून खंडणी घेतल्याने मालाबार हिल पोलिसांनी उत्तर प्रदेशातील व्यक्तीला घेतलं ताब्यात)
या प्रकरणाच्या तपासासाठी एक पोलीस पथक स्थापन करण्यात आले आहे. या प्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांशीही संपर्क साधला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे चोरांचा शोध घेतला जात आहे.