पिण्याचे पाणी, Image used for representational purposes only. (Photo Credits: Pixabay)

मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळणारे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मध्य प्रदेशच्या मंदसौर (Mandsaur) जिल्ह्यातील गरोठ रेल्वे स्थानकात शौचालयाच्या नळाला प्लास्टिकची पाईप जोडून त्याने पिण्याच्या पाण्याची टाकी भरल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात स्टेशन मास्टरला निलंबित केले आहे. कोटा रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक अजय कुमार पाल यांनी सांगितले की, 1 मार्च रोजी गरोठ रेल्वे स्थानकातील एका खासगी कंपनीत कार्यरत सफाई कर्मचाऱ्याने शौचालयाच्या नळाला प्लास्टिक पाईप जोडली आणि पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी भरले.

या प्रकरणात कठोर कारवाई केली आहे. शुक्रवारी गरोठ स्टेशन मास्टर चौथमल मीना यांना निलंबित केले आणि त्याच दिवशी सफाई कामगाराला सेवेतून काढून टाकले. हा प्रकार समोर येताच स्टेशन मास्तर मीना यांनी ताबडतोब पिण्याच्या पाण्याची टाकी साफ केली आणि टाकी पुन्हा शुद्ध पाण्याने भरली. गरोठ रेल्वे स्टेशन दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावर आहे आणि हे स्टेशन कोटा रेल्वे विभागात येते.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या अडचणी वाढल्या. बर्‍याच प्रवाशांनी व्हिडिओ ट्वीट करून रेल्वेमंत्र्यांकडे यासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. हा वाद वाढताच प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. स्टेशनवर असलेल्या पॅसेंजर हॉलमध्ये शौचालयाच्या नळाला पाईप लावण्यात आल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे. (हेही वाचा: Viral Video: उंटासोबत सेल्फी घेत होती महिला, प्राण्याने केले असे काही तुम्हीही हसून व्हाल लोटपोट)

प्रवाशांनी सांगितले की एकीकडे जीएम प्रवासी सुविधांचा आढावा घेण्यासाठी कोटा रेल्वे मंडळाच्या दौर्‍यावर आहेत, तर दुसरीकडे रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या आरोग्याशी खेळत आहे. या प्रकरणात अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रवाशांना पिण्यासाठी टाकीमध्ये पाण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे.