गणपती विसर्जन करताना नाव उलटली, 11 जणांचा मृत्यू, 5 थोडक्यात बचावले
गणपती विसर्जनावेळी दुर्घटना | (Photo Credits: ANI)

गणपती विसर्जन करताना नाव तलावात उलटून घडलेल्या अपघाता 11 जणांचा मृत्यू झाला तर, 5 लोकांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. मध्यप्रदेश (Madhya Pradesh) राज्याची राजधानी भोपाळ (Bhopal) येथील खटलापुरा घाट ( Khatlapura Ghat) परिसरात ही घटना घडली. घटनास्थळावर एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जावान पोहोचले असून, मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. प्राप्त माहितीनुसार, अपघात घडलेल्या नावेत एकूण 19 लोक होते. हे सर्वजण गणपती विसर्जनासाठी तलावात गेले होते. मात्र, मुसळधार पावसामुळे तलावातील पाणी अचानक वाढले आणि ही दुर्घटना घडली.

दरम्यान, राज्य सरकारने दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, पिपलानी येथील 1100 क्वार्टर येथे राहणारे काही लोक गणपती विसर्जनासाठी खटलापूरा घाट येथे आले होते. सोबत आणलेली गणपती मूर्ती विसर्जन करण्यासाठी यातील काही लोक (19) नावेच्या माध्यमातून तलावात गेले. मात्र, तलावात अचानक वाढलेले पाणी आणि नावेत अधिक संख्येने असलेले लोक. यामुळे नावेचा तोल जाऊन ती हेलखावे खाऊ लागली. नावेतील लोकांचा गोंधळ आणि हालचाल यांमुळे नाव अधिकच हालू लागली. अखेर नाव तलावातील पाण्यात उलटली. (हेही वाचा, मध्य प्रदेश: पाऊस थांबविण्यासाठी बेडूक दाम्पत्याचा घटस्फोट; चंद्रावर पोहोचलेल्या विज्ञानवादी भारतातील धक्कादायक प्रकार)

या घटनेवर प्रतिक्रिया देताना मध्य प्रदेश राज्याचे जनसंपर्क मंत्री पीसी शर्मा यांनी प्रचंड दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, ही अत्यंत वाईट घटना आहे. मी मृतांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेधना आहेत. मुसळधार पावसामुळे भोपाळ शहरासह मध्यप्रदेशातील इतरही अनेक ठिकाणी जलसंकट ओढावले आहे. त्यातच धरणांची साठा क्षमता पूर्ण भरल्यामुळे धरणाचे दरवाजेही उघडावे लागत आहेत.