Explosion (Image used for representational purpose only) (Photo Credits: PTI)

पंजाबमधील लुधियाना न्यायालयात (Ludhiana Court) झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा सूत्रधार जसविंदर सिंग मुलतानी (Jaswinder Singh Multani) याला जर्मनीत अटक करण्यात आली आहे. जसविंदर सिंग बंदी घातलेल्या शीख फॉर जस्टिसशी (Sikh for Justice) संबंधित आहे. महत्वाचे म्हणजे जसविंदर दिल्ली आणि मुंबईतही दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत होता. जसविंदर हा शिख फॉर जस्टिसचे संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या अगदी जवळची व्यक्ती आहे. पन्नू हा भारतातील प्रतिबंधित दहशतवादी आहे. मोदी सरकारच्या विनंतीवरून जसविंदर सिंगला जर्मन पोलिसांनी एरफर्ट परिसरातून अटक केल्याचे सांगितले जात आहे.

जसविंदर सिंग हा खलिस्तान समर्थक असून त्याचे पाकिस्तानशी जवळचे संबंध आहेत. जसविंदरचा पंजाबमध्ये शस्त्रास्त्रांच्या तस्करीतही सहभाग आहे. जसविंदर हा पंजाबमधील होशियारपूरचा रहिवासी असून तो अनेक दिवसांपासून देशात फुटीरतावादी कारवाया करत आहे. पंजाबच्या लुधियाना जिल्हा न्यायालयात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या प्राथमिक तपासात यंत्रणांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. एनएसजी बॉम्ब स्क्वॉड आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना येथे वापरण्यात आलेल्या बॉम्बमध्ये उच्च स्फोटक असल्याचे आढळून आले आहे.

अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा या घटनेमागे हात असल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंतच्या तपासात समोर आलेले सर्व पैलू हे मृत व्यक्तीनेच कट रचल्याकडे इशारा करतात. बॉम्ब चुकून टॉयलेटमध्ये पडल्याने अचानक हा स्फोट झाला. मृताच्या शरीरातून अॅल्युमिनियम आणि प्लास्टिकचे तुकडे सापडले आहेत. लुधियाना कोर्टात 23 डिसेंबरला झालेल्या स्फोटात माजी हेड कॉन्स्टेबल गगनदीप सिंग ठार झाले तर सहा जण जखमी झाले. (हेही वाचा: हुंडा दिला नाही म्हणून बायकोला जिवंत जाळल्यानंतर नवऱ्यासह सासरच्या मंडळींनी काढला पळ)

बॉम्बमध्ये नक्की कशाचा वापर करण्यात आला याची पुष्टी झालेली नाही. कारण स्फोटामुळे शौचालयाचा पाण्याचा पाइप फुटला, बॉम्बचे अवशेष वाहून गेले. परंतु यात आरडीएक्सची उपस्थिती नाकारता येत नाही. आता फक्त फॉरेन्सिक तपासणीत IED मध्ये असलेले पदार्थ शोधले जातील. दरम्यान, जसविंदर सिंग मुलतानी याने सिंघू सीमेवर शेतकरी नेते बलवीर सिंग राजेवाल यांच्या हत्येचा कट रचला होता. त्यासाठी त्याने जीवन सिंग नावाच्या व्यक्तीला शस्त्रे पुरवली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी जीवन सिंगला आधीच अटक केली होती.