
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना महागाईचा फटका बसला आहे. कारण आजापासून सब्सिडी असणाऱ्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सातत्याने पाचव्या वेळेस गॅस सिलिंडरच्या किंमती वाढत आहेत. शहरात घरगुती गॅसच्या किंमती 21.50 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे आता सामान्यांच्या शिखाला चांगलीच कात्री बसणार आहे. एवढेच नाही तर गॅस सिलिंडर सोबत रेल्वेच्या तिकिट दरात ही वाढ करण्यात आली आहे.
शहरात 14.2 किलोग्रॅम असणाऱ्या गॅसची किंमत 22 रुपयापर्यंत वाढवली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, 14.2 किलो असणाऱ्या एलपीजी सिलिंडरसाठी दिल्लीत 714 रुपये, कोलकाता 74 रुपये आणि मुंबईत 684.50 रुपये आणि चैन्नई येथे 734 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. ऑगस्ट 2019 पासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असून 140 रुपयापर्यंत त्याचे दर पोहचले आहेत.
त्याचसोबत 19 किलोग्रॅम असणाऱ्या सिलेंडरच्या दरात जवळजवळ 33 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 1 जानेवारी पासून या सिलेंडरसाठी दिल्लीत 1241 रुपये, कोलकाता येथे 1308.50 रुपये, मुंबईत 1190 रुपये आणि चैन्नई 1363 रुपये आहे. गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे नागरिकांना त्याचा फटका बसलाच आहे.
तसेच मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने एक्सप्रेस आणि मेल गांड्याच्या (स्लीपर डब्बा) तिकीट दरात 2 पैसा प्रतिकिलोमीटर तर, एसी क्लास च्या तिकीट दरात 4 पैसे प्रतिकिलोमीटर वाढ केली होती. मात्र, लोकल रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही.